मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: १० वर्षानी होणाऱ्या वसई-विरार पालिका निवडणुकीत भाजप आणि बविआ या दोघांमध्ये खरी लढत आहे. तर ही निवडणूक भाजप, बविआ, उद्धवसेना, शिंदेसेना यांच्या अस्तित्वाची आहे.
मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. बविआ, काँग्रेस आणि मनसेसोबत आघाडी झाली नसल्याने 'एकला चलो'चा नारा देणाऱ्या उद्धवसेनेने सर्वच ११५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनसेच्या २ उमेदवारांनी आणि काँग्रेसच्या ८ जणांनी अर्ज दाखल केले.
बविआकडून सर्व जागांवर उमेदवार
तर बविआच्या उमेदवारांनी सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासह भाजपच्या ८८ आणि शिंदेसेनेच्या २७उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गावडे यांच्या स्वराज्य अभियान पक्षाने बविआसोबत युती केली आहे.
भाजपकडून एकमेव नगरसेवक किरण भोईर यांचा पत्ता कट
वसई-विरार पालिकेसाठी अर्ज भरण्याच्या दिवशी भाजपने अनपेक्षितरीत्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे भाजपमध्ये मोठा असंतोष बघायला मिळत आहे. मागील निवडणुकीत जिंकलेले भाजपचे एकमेव माजी नगरसेवक किरण भोईर यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.
काही दिवसांपासून भाजपमध्ये बविआ आणि अन्य पक्षातून कार्यकर्ते, नेते यांचे प्रवेश सुरू होते. त्यामुळे पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू होती. याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे पत्र लिहून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याची दखल पक्षाने घेतली नाही. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी किरण भोईर यांचे तिकीटही पक्षाने ऐनवेळी कापले.
वसई-विरारला राजकीय समीकरणे बदलली
स्वराज्य अभियान पक्षाचे अध्यक्ष आणि हितेंद्र ठाकूर यांचे राजकीय विरोधक असलेले धनंजय गावडे यांनी अचानक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांच्याशी जवळीक केली आहे. गावडे यांच्या स्वराज्य अभियान पक्षाने बहुजन विकास आघाडीसोबत युती केली आहे. यामुळे नवीन समीकरणे दिसत आहेत.
धनंजय गावडे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. ते हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. गावडे यांनी ठाकूर कंपनीचा भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामाविरोधात रान उठवले होते. नंतर गावडे यांच्यावरच खंडणीचे १२ गुन्हे दाखल झाले होते. काही काळ तुरुगांत घालविल्यानंतर मागील वर्षी गावडे यांनी पुनरागमन केले. त्यांनी स्वराज्य अभियान पक्षाची स्थापना केली. गावडे यांनी मंगळवारी मात्र शेवटच्या दिवशी चक्क ठाकूर यांच्या बविआसोबत हातमिळवणी केली आहे.
Web Summary : Vasai-Virar elections see intense competition between BJP and Bahujan Vikas Aghadi (BVA). All parties filed nominations, with Uddhav Sena contesting all seats. Unexpectedly, BJP denied tickets to loyalists, while political rivals joined forces, reshaping alliances.
Web Summary : वसई-विरार चुनाव में भाजपा और बहुजन विकास अघाड़ी (बीवीए) के बीच कड़ी टक्कर है। सभी दलों ने नामांकन दाखिल किया, उद्धव सेना सभी सीटों पर चुनाव लड़ी। अप्रत्याशित रूप से, भाजपा ने वफादारों को टिकट से वंचित कर दिया, जबकि राजनीतिक प्रतिद्वंद्वियों ने गठबंधन को नया रूप दिया।