वसई-विरार शहरामध्ये मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता, मात्र आता पुन्हा गणेशोत्सवा जसा संपला आणि बाधित रुग्ण व मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेल्याने वाढीनं शहराची चिंता आता वाढू लागली आहे. किंबहुना नक्कीच याचा सर्वाधिक परिणाम येथील स्थानिक स्वराज्य संस्था व त्याच्या विकासकामावर होत असून, शहरात महापालिका प्रशासन केवळ कोरोनावरच लक्ष केंद्रित करत असल्याने नागरिक म्हणा अथवा विविध राजकीय पक्षात खास करून सत्ताधारी पक्षात नाराजी आहे.
त्यामुळे कधी एकदा वसई-विरार महापालिका प्रशासनावर असलेला प्रशासक कालावधी संपतो व नवीन कार्यकारणी अस्तित्वात येते, असे सर्वांचे काहीसे झाले आहे. मात्र हे दिवसा पाहिलेलं दिवास्वप्न यास अपवाद म्हणून वसई-विरार शहर महापालिकेची संभाव्य तिसरी सार्वत्रिक निवडणूक आणखी काही काळ म्हणजे एप्रिल आणि मेपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.
जोपर्यंत निवडणुका संपन्न होऊन नवीन बॉडी बसत नाही, तोपर्यंत वसई-विरार महापालिकेच्या कारभाराची सूत्रे ही आयुक्त तथा प्रशासक अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या गंगाथरन डी यांच्याच हाती असणार आहे. दरम्यान वसई-विरार शहर महापालिकेची मुदत 28 जून 2020 रोजी संपल्यानंतर त्यास मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी वसई-विरार शहर महापालिकेच्या सत्ताधारी वर्गांनी मागणी केली होती.
मात्र राज्य शासनाने ती सपशेल फेटाळून लावत महापालिकेवर दोन महिने अगोदरच आयुक्त व प्रशासक एकाचवेळी नेमला. अर्थातच राज्यातील शिवसेनेच्या नगरविकास मंत्र्यांनी बविआला दे धक्का देण्यासाठी महापालिकेचे आयुक्त म्हणून गंगाथरन डी या आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि काही दिवसातच याच आयुक्तांना प्रशासक ही नेमले. परिणामी सध्या पालिकेचा सर्व कारभार आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी यांच्या हाती असून एकाअर्थी पालिकेत सत्ताधारी दूर व एकछत्री अंमल सुरू आहे. महापालिका निवडणुकीबाबत पाहिलं तर नुकतेच पालिकेच्या मुख्यालयात प्रारूप रचनांवर हरकती व सूचनांसंदर्भात सुनावणी घेण्यात आली, यात 17 पैकी एकच हरकत मान्य करत ती निवडणूक आयोगापुढे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.
खरं तर डिसेंबर 2020 पर्यंत वसई-विरार महापालिकेवरील प्रशासक राज संपत असल्याने कदाचित जानेवारी किंवा फेब्रुवारी 2021 मध्ये महापालिकेची निवडणूक होण्याचे संकेत मिळत असले तरी मात्र पालिका हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आतापर्यंत कोरोना बधितांचा आकडा 22 हजारांच्या पार केला आहे, तर 439 जणांचा या कोरोनाने मृत्यू झाला आहे.दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा पादुर्भाव पाहता पुढील वर्षी जानेवारी महिन्यात निवडणुका होतील की नाही याबात साशंकता जरूर आहे. तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या जानेवारीऐवजी आणखी चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे स्पष्ट मत आता वसईतील राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे, खरं तर आता शहरी भागातील थोडी संख्या जरी आटोक्यात असली तरी ग्रामीण भागात देखील कोरोना वाढत चालला आहे.
सहकारी बँका,सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या; 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ ! कोरोनाचा वाढता आकडा पाहता स्थनिक स्वराज्य संस्थांच्या ही निवडणुका हमखास पुढे जाणार, अशी शक्यता अधिक वर्तवण्यात येत असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या हौशी लोकप्रतिनिधींना हा धक्का म्हणजे कोरोनापेक्षा ही तीव्र आहे.