विक्रमगड : आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट येणार आहे़ मात्र यामुळे आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपुंजी रक्कम जमवली आहे़ ती बदलून वापरता यावी, यासाठी त्याची सध्या धडपड चालू असून जर आपल्याकडील या जुन्या नोटा वटल्या नाहीत, यामध्ये काही अडचण उद्भवल्यास आपण आयुष्यातून उठू की काय अशी भीती त्याला वाटते आहे़ या निर्णयाचे मात्र बिल्डर्स,ज्वेलर्स,वकील, हे स्वागत करीत आहेत,सर्वच बॅकेमध्ये बुधवारी गर्दी होती सर्व बँका हाऊस फुल झालेल्या होत्या सायंकाळपर्यत गर्दी अशीच राहीली. बॅकांच्या बाहेर रस्त्यापर्यंत रांगा होत्या त्यात गाव-खेडयापाडयावरील आदिवासी स्त्री-पुरुषांची संख्या जास्त होती़तसेच या निर्णयाचा पडसाद व्यापारी बाजार पेठेवर झाला. विक्रमगडचा बाजार मोठा असल्याने व या परिसरात संदेशवहन व टीव्हीचा प्रसार फारसा नसल्याने खेडोपाड्याहून येणाऱ्या असंख्य गाव खेडयापाड्यावरील आदिवासींनी ५०० व १००० नोटा खरेदीकरीता आणलेल्या होत्या. त्यांना नोटा रद्द झाल्याची गंधवार्ताही नव्हती. त्यांच्याकडे १००, ५०, २०, १०च्या नोटा नव्हत्या. त्यामुळे व्यापारी वर्ग या नोटा घेण्यास तयार नसल्याने मोठी अडचण झाली़ गिऱ्हाईक आहे, माल आहे पण गल्ले रिकामे अशी स्थिती निर्माण झाली. याचा फटका काळी, पिवळीवाल्यांना बसला. कारण त्या सगळ्यांचे भाडे १०, २०, ५०, १०० अशाच नोटांमध्ये आकारले, दिले जाते. परंतु या नोटा जनतेकडे नसल्याने अनेकांनी घराबाहेर पडणेच टाळले. (वार्ताहर)
सामान्य गोंधळलेलेच!
By admin | Updated: November 11, 2016 02:51 IST