- मंगेश कराळे नालासोपारा - ट्रान्सफॉर्मर चोरणाऱ्या तीन आरोपींच्या सराईत टोळीला यूपीतून अटक केले आहे. आरोपींकडून ५ गुन्ह्यांची उकल करत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करायला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी गुरुवारी माहिती दिली आहे.
कामणच्या कोल्ही चिंचोटी परिसरातील जाधववाडी येथे महावितरणने लावलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर आणि ऑइल ११ ते १२ फेब्रुवारीच्या दरम्यान चोरीला गेले होते. चोरट्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी १० हजार रुपये किंमतीचे ३०० लीटर ऑइल आणि ८० हजारांचे ६०० किलो कॉपर उघड्यावरून चोरी करून नेले होते. अजय चौधरी (३२) यांनी १२ फेब्रुवारीला नायगांव पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला होता.
या दाखल अपराध प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी समांतर अन्वेषण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरील वेगवेगळया ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी, भ्रमणध्वनींचे तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे सदर गुन्ह्याची उकल केली आहे. आरोपी खान (२६), अनिल यादव (२२) या दोघांना यूपीतून २३ फेब्रुवारीला ताब्यात घेऊन अटक केले आहे. दोन्ही आरोपींनी पोलीसांना दिलेल्या माहितीच्या आधारे सक्रिय सहभागी आरोपी जयसिंग चव्हाण (३६) याला नवीन पनवेल येथून अटक केले आहे.
आरोपींकडून नायगांवच्या गुन्ह्याची उकल करत याव्यतिरिक्त आणखी चार ट्रान्सफार्मर व त्यातील ऑइलच्या गुन्ह्यांची उकल करत ६२० किलो कॉपर, २० लीटर ऑईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार असा ६ लाख ५२ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडून नायगाव येथील २, वाडा येथील १ आणि मांडवी येथील २ असे एकूण ५ गुन्ह्यांची उकल केली आहे. तसेच आरोपी अनिल व जयसिंग या दोन्ही आरोपींवर चोरीचे ८ पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सपोनि सोपान पाटील व सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहा. फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार मुकेश पवार, रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, राजाराम काळे, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत ठाकूर, अकिल सुतार, राहुल कर्पे, अनिल साबळे, अजित मैड, प्रतिक गोडगे, राजकुमार गायकवाड, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी आणि सहा फौजदार संतोष चव्हाण यांनी केली आहे.