उड्डाणपुलाच्या संथगतीमुळे वाहतूककोंडी, नागरिकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:00 AM2020-11-28T02:00:37+5:302020-11-28T02:01:16+5:30

गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत.

Traffic congestion due to flyover delays | उड्डाणपुलाच्या संथगतीमुळे वाहतूककोंडी, नागरिकांमध्ये संताप

उड्डाणपुलाच्या संथगतीमुळे वाहतूककोंडी, नागरिकांमध्ये संताप

Next

पारोळ : अतिमहत्त्वाचा असलेला नायगाव उड्डाणपूल रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभारामुळे अधांतरी लटकला आहे. या उड्डाणपुलाच्या कामाच्या संथगतीमुळे परिसरात वाहतूककोंडी होत असल्याने हा पूल लवकर पूर्ण व्हावा, यासाठी नायगाव पूर्वेतील नागरिक वाट पाहत आहेत.
नायगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांची परवड होऊ लागली आहे. परिसरात उद्भवणारी रोजची वाहतूककोंडी यामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशातच जुचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपुलाचे काम ग्रामस्थांच्या विरोधामुळे बंद आहे.

येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२१ साली नायगाव उड्डाणपूल सुरू झाल्यास बंद स्थितीत असलेल्या जुचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूककोंडी होण्याचा धोका संभवतो. अशा प्रसंगी भविष्यात वाहतूककोंडीचा नागरिकांना सामना करावा लागू नये म्हणून नायगाव पूर्व परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दोन्ही पूल तत्काळ सुरू करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. तसेच नायगाव उड्डाणपुलाचे सध्याचे कासवछाप काम पाहता पुलाचा शुभारंभ होता होता २०२२ साल उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नायगावचा हा उड्डाणपूल भविष्यात येथील वाहतूककोंडीवर प्रभावी पर्याय ठरणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच येते आहे. या पुलाचे काम मार्गस्थ झाल्यास वसई ते मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होणार आहे. नायगाव पूर्व-पश्‍चिम जोडणाऱ्या या पुलाचे काम प्रशासनाकडून लवकर व्हावे, यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चे-आंदोलने केली. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही, असा आरोप स्थानिक करीत आहेत. दरम्यान, हा पूल पुढील वर्षी मे २०२१ अखेरीस वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूकदार आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून सध्या परवानगी नसल्याने पुलाचे काम रखडले आहे.

Web Title: Traffic congestion due to flyover delays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.