वसई : वरसोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा जाब विचारण्यासाठी शिवसेना शुक्रवारी हायवेवर चक्का जाम करणार आहे. यावेळी अधिकाऱ्यांना घेरावही घालण्यात येणार आहे.वरसोवा पुलाला तडे गेल्याने सप्टेंबर महिन्यापासून जुन्या पूलावरून अवजड वाहनांना वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकतर्फी वाहतूक सुरु ठेवण्यात आल्याने हायवेवर दररोज वाहनांच्या तीन-चार किलोमीटरच्या रांगा लागलेल्या असतात. दररोजच्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पूलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडीचा जाच सहन करावा लागत आहे. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पूलाजवळील दर्या सागर हॉटेलसमोर रास्ता रोको केले जाणार आहे. पालघर जिल्हा संपर्क प्रमुख अनंत तरे, जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर यांनी दिली. यावेळी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
आज शिवसेनेचा चक्का जाम
By admin | Updated: March 24, 2017 00:55 IST