वसईकरांवर तीन नवे कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:29 AM2018-09-21T03:29:23+5:302018-09-21T03:29:45+5:30

वसई-विरार महापालिकेने रहिवाशांवर नव्या करांचा बोजा लादला आहे.

Three new taxes on Vasikar | वसईकरांवर तीन नवे कर

वसईकरांवर तीन नवे कर

Next

पारोळ : वसई-विरार महापालिकेने रहिवाशांवर नव्या करांचा बोजा लादला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठीचा खर्च परवडेनासा झाल्यामुळे पालिकेने जनतेवर प्रति मालमत्ता चार रु पयांचा उपभोक्ता कर लावला आहे. इंधन दरवाढीचे कारण देऊन परिवहनच्या तिकीटदरांतही वाढ करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिकांवर सांडपाणी प्रकल्पासाठी कर लावला गेला आहे.
बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे तिन्ही प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आले. केवळ शिवसेनेच्या गटनेत्याने ही करवाढ जनतेसाठी अयोग्य असल्याचे सांगून विरोध केला.
कचरा करताय, ४ रु पये भरा!
वसई-विरार शहरात दररोज ६५० टन कचरा जमा होतो. तो उचलणे, कचराभूमीवर नेणे आणि तेथे त्याचे विघटन करणे या कामासाठी महापालिकेला वर्षांला १७६ कोटी रुपये खर्च येतो. प्रत्येक नागरिक हा दिवसाला ४५० ग्रॅम कचरा निर्माण करीत असतो. त्यामुळे महापालिकेने नागरिकांवरच कर लादण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा प्रस्ताव महासभेत आला होता. स्वच्छ भारत अभियानामध्ये ही तरतूद असल्याचे आयुक्तांनी सांगितले. हा नवीन कर नसून सेवाकर असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका इतर कर आकारत असतांना हा कर का घेते, असा सवाल करून शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी विरोध केला.
शहरात साडेसहा लाख मालमत्ता असून दर महिन्याला त्यांच्यावर चार रुपये आकारले जाणार आहे, असे सांगून हा विरोध फेटाळून लावला. केबलला महिन्याला ४00 रु पये देता मग कचरा निर्मूलनासाठी ४ रुपये भरायला विरोध का, असा सवाल नगरसेवक पंकज ठाकूर यांनी केला.
विकासकांवरील कराला मात्र हरकत : पालिकेने २० हजार चौरस फुटांचे बांधकाम करणाऱ्या विकासकांवर सांडपाणी प्रक्रि या कर आकारण्यासही मंजुरी दिली दिली आहे. महापालिकेकडे सध्या विरार येथे ३० दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रकल्प आहे. विकासकाने तयार केलेला प्रकल्प या प्रकल्पाला जोडला जाणार आहे. शहरात सात ठिकाणी सांडपाणी प्रकल्प प्रस्तावित आहे. मग केवळ विरारमध्येच सांडपाणी प्रकल्प असताना सर्व विकासकांवर हा कर का, अशी हरकत काही सदस्यांनी घेतली होती. स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी या प्रश्नावर बोलतांना रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाप्रमाणे याची गत होऊ नये, अशी टीका केली.
>बसप्रवास महागल्याचे समर्थन, विरोधकांनी पाळले मौन
परिवहन सेवेच्या दरवाढीच्या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. मात्र हे दर जास्त असल्याचा आक्षेप शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी घेतला सर्वसामान्य परिवहनच्या बसमधून प्रवास करतो. त्यामुळे त्याला ही दरवाढ जाचक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक उमेश नाईक यांनी दरवाढीचे समर्थन केले. परिवहन संचालकांनी २०१६ मध्ये सुचविल्याप्रमाणेच ही दरवाढ करीत असल्याचा दावा त्यांनी केला. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले असले तरी २०१६ च्या निर्देशनानुसार ही वाढ केली जात आहे, असे सांगून इतर महापालिकेपेक्षा ती कमीच असल्याचे त्यांनी सांगितले. ही दरवाढ स्थानिक नागरिकांच्या हिताची असल्याचेही ते म्हणाले. मात्र इतरांनी परिवहनच्या दरवाढीबद्दल मौन बाळगले आणि दरवाढीचा हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.

Web Title: Three new taxes on Vasikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.