तेरा लाखांचा अवैध मद्यसाठा जव्हारला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:07 AM2019-08-29T00:07:03+5:302019-08-29T00:08:37+5:30

सूत्रधार सुरतमध्ये : जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर, पालघर अबकारी आणि पोलिसांची कामगिरी

thirteen lakh illegal liquor seized | तेरा लाखांचा अवैध मद्यसाठा जव्हारला जप्त

तेरा लाखांचा अवैध मद्यसाठा जव्हारला जप्त

Next

हितेन नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह त्यांचा टेम्पो भाड्याने घेऊन त्यातून सिल्वासा येथून १३ लाख किमतीचा अवैध साठा नाशिककडे नेत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जव्हार येथे पकडला. या टेम्पोत जीपीआरएस सिस्टम लावून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार या टेम्पोवर सुरत येथून मोबाइलच्या साहाय्याने नियंत्रण ठेवीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी दिली.


जव्हार - नाशिक मार्गावर टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैध मद्यसाठा सिल्वासा येथून नाशिक येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री हा टेम्पो सिल्वासामधून नाशिककडे जात असताना जव्हार येथे थांबविण्यात आला. टेम्पो चालकाने मागचा फालका उघडला असता सर्वत्र टॅमोटोने भरलेले प्लास्टिकचे क्रेट रचलेले होते. अधिकाऱ्यांनी एका मागोमाग रचलेले दोन थर काढल्यानंतरही टॅमोटोचे क्रेट निघत असल्याचे पाहिल्यावर आपल्याला मिळालेली टीप चुकीची असल्याचा संशय कर्मचाºयांनी व्यक्त केला. मात्र आपल्याला टीप देणारा खबºया विश्वासू असल्याने सुभाष जाधव यांनी सर्व क्रेट खाली करायला लावले आणि त्यांचा संशय खरा ठरत मागच्या दोन्ही रांगेत विदेशी मद्याचे १२० बॉक्स मोठ्या हुशारीने लपवून ठेवल्याचे दिसून आले.


हा टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर तो पालघरच्या अधीक्षक कार्यालयात घेऊन जाण्यासाठी तो सुरू करून वळण घेतल्याबरोबर टेम्पो बंद पडला. तो सुरूच होत नसल्याने मॅकॅनिकला बोलावण्यात आल्यानंतर अनेक प्रयत्न सुरू करूनही तो सुरू होत नव्हता. मेकॅनिकने स्टेअरिंगच्या खालचा कप्पा उघडला असता त्यात जीपीएस सिस्टिम लावण्यात आल्याचे दिसले. टेम्पोने आपला मार्ग बदलल्याचे ही सिस्टीम चालविणाºयाला कळल्यानंतर त्याने टेम्पो बंद केला. याबाबत माहिती घेतल्यावर या प्रकरणाचा सूत्रधार मनिषभाई राजपूत हा सुरतमध्ये बसून ही अद्ययावत यंत्रणा चालवित असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याशी संपर्क साधण्यात पो.नि.जाधव यशस्वी ठरले. या संपूर्ण गाडीचे कंट्रोल सुरतमध्ये बसून राजपूत चालवीत असून सिल्वासावरून माल भरलेली गाडी चालकाच्या हातात दिल्यानंतर नाशिक हायवे वरील एका ठिकाणावर टेम्पो पोचल्यावर राजपूत अन्य दुसºया चालकाच्या ताब्यात हा टेम्पो देऊन त्यांनी निघून जायचे, अशी खेळी खेळली जात होती.

शेतकºयांची होते फसवणूक
या अवैध मद्यसाठ्याच्या प्रकारात आरोपी राजपूत यांनी नाशिक (सावर पाडा) येथील नरेंद्र पवार या शेतकºयांचा टेम्पो करार करून भाड्याने घेतला होता. भाजीपाला विक्र ीच्या नावाखाली सिल्वासा येथून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा भरून तो नाशिक व अन्यत्र भागात लेबल बदलून विक्री केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. नाशिकवरून भाजीपाला भरून दररोज शेकडो टेम्पो पालघर, ठाणे, सुरत आदी भागात जात असतात. या टेम्पोची तपासणी शक्यतो पोलीस करीत नसल्याने मुख्य आरोपीने ही शक्कल लढविल्याची माहिती जाधव यांनी दिली. जप्त केलेल्या १२० बॉक्सची किंमत एकूण १३ लाख असून हा अवैध मद्यसाठा व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले असून या प्रकरणी प्रदीप कुमावत आणि विक्रमसिंग रा.सुरत यांना अटक केली आहे. या कारवाईत निरीक्षक जाधव, दुय्यम निरीक्षक श्रीपाद मिसाळ, रामदास काटकर, शिपाई राठोड, पवार, कराड आदिंनी सहभाग घेतला.

Web Title: thirteen lakh illegal liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.