जव्हार : जव्हार तालुक्यातील घिवंडा परिसरातील खैराची चोरटी तोड करून वाहतूक करणारा ट्रक शुक्रवारी रात्री, १२ वाजता पकडण्यात आला. त्यातील दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांना २ दिवासांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.गेल्या महिनाभरापासून रात्रीच्या वेळी खैरांची चोरटी वाहतूक सुरु होती. याची माहिती मिळाल्यामुळे वन विभागाने शुक्रवारी संध्याकाळी सापळा लावला होता. त्यात आयशर ट्रक सापडला. त्याची तपासणी केली असता त्यात खैराची चोरटी लाकडे सापडली. चालकांनी वनकर्मचाऱ्यांना पाहताच पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ३५ किलोमीटरचा पाठलाग करून त्याला मोखाड्यातील निळमाती वन चेक पोस्ट नाक्यावर पकडण्यात आले. हा ट्रक आणि त्याचा चालक भिवंडी तालुक्यातील पडघा येथील असल्याचे समजते. अनेकदा ट्रक आणि मुद्देमाल हाती लागतो परंतु ड्रायव्हर अथवा मालाचा मालक फरार दाखविला जातो. यावेळी मात्र ट्रकचा चालक व त्याचा साथीदार हाती लागला आहे.(वार्ताहर)
चोरट्या खैराचा ट्रक पकडला
By admin | Updated: June 20, 2016 01:53 IST