नालासोपारा : पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या महिलांनी संतोष भवन नाक्यावरील चार रस्त्यावर रास्ता रोको केला. २०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन शनिवारी सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेपर्यंत रस्ता रोखून धरला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
या रास्ता रोकोमध्ये सामील झालेल्या महिलांनी सांगितले की, वालईपाडा येथील नर्मदाबाई चाळीत राहणारे व पेशाने रिक्षा चालवणारे नंदलाल यादव (४५) गुरु वारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडले आणि ते गायब झाले. आजूबाजूला शोध घेऊनही ते सापडले नसल्याने त्यांचे अपहरण किंवा मिसिंगची तक्र ार नोंदवण्यासाठी संतोष भवनच्या बिट चौकीतील पोलिसांकडे गेलो, पण त्यांनी मिसिंगची तक्र ार घेण्यास वेळ लागेल, तुम्ही त्यांचा सगळीकडे शोध घ्या, असे बोलून टाळाटाळ करत गुन्हा दाखल न करता त्यांना घरी पाठवून दिले. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मिसिंग असलेले नंदलाल यादव बेशुद्ध अवस्थेत संतोष भवन येथील भक्तीधाम येथील रस्त्याच्या कडेला सापडले. लोकांनी त्यांना उपचारासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या रु ग्णालयात भरती केले. पण त्यांची स्थिती नाजूक असल्याने डॉक्टरांनी मुंबईच्या नायर रुग्णालयात नेण्यासाठी सांगितले. नायर रुग्णालयात उपचार करताना यादव यांचा शुक्र वारी रात्री मृत्यू झाला आहे. ही माहिती ते राहत असलेल्या परिसरात आणि आजूबाजूच्या विभागात कळल्यावर संतापलेल्या २०० महिलांनी शनिवारी सकाळी ३ ते ४ तास रस्ता रोको केला होता. नालासोपारा स्टेशन ते हायवेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.या रास्ता रोकोची माहिती मिळाल्यावर तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांनी स्वत: जाऊन संतप्त महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वांच्या वेगवेगळ्या समस्या ऐकून सर्वांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आणि यादव यांच्या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास करून दोषींना शिक्षा केली जाईल, असे सांगून समजूत काढल्यावर २ वाजता रास्ता रोको आटोपला आणि नाराज महिला घरी निघून गेल्या.