वसई : पालघर विधानसभा निवडणुकीसंदर्भात माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १० जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच या मतदारसंघात निवडणूक घेण्यात येईल, असा अंदाज आहे. ही निवडणूक बिहार विधानसभा निवडणुकीच्याच वेळी घेण्याकडे निवडणूक आयोगाचा कल आहे.पालघर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सेनेचे आ. कृष्णा घोडा यांनी निवडणूक खर्चाचे विवरणपत्र मुदतीत सादर न केल्यामुळे प्रतिस्पर्धी व काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर येत्या १० जुलै रोजी सुनावणी असून त्याच दिवशी अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. या याचिकेमुळे निवडणूक आयोगाने या मतदारसंघात निवडणूक घेण्याचा आपला निर्णय मागे घेतला होता. १० जुलैनंतर येथे निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होणार असून ही पोटनिवडणूक बिहार राज्याच्या निवडणुकांबरोबर घेण्यात येईल, असा अंदाज आहे. न्यायालयाने जर शिवसेनेचे दिवंगत आ. कृष्णा घोडा यांची निवड रद्दबातल ठरविल्यास कदाचित राजेंद्र गावित यांना आमदारकीची संधी उपलब्ध होऊ शकते. (प्रतिनिधी)
याचिकेचा निकाल १० जुलैला अपेक्षित
By admin | Updated: July 8, 2015 22:14 IST