भाव नसल्याने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल; दलाल तुपाशी शेतकरी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 02:55 AM2021-03-24T02:55:13+5:302021-03-24T02:55:23+5:30

चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल 

Red mud of tomatoes in the field due to lack of price; Broker Tupashi starves farmers | भाव नसल्याने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल; दलाल तुपाशी शेतकरी उपाशी

भाव नसल्याने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल; दलाल तुपाशी शेतकरी उपाशी

Next

पारोळ : वसई पूर्वेकडील ग्रामीण भागातील थळ्याचा पाडा, आडणे, भाताणे, कळभोण, शिरवली येथे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते, मात्र या वर्षी दर कमी असल्याने शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत, मात्र शहरातील बाजारात ४० रुपये किलो टोमॅटो विकला जात आहे. ‘दलाल तुपाशी शेतकरी उपाशी’ अशीच परिस्थिती पाहायला मिळते. दरम्यान, परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने शेतातच फेकून दिलेल्या टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. 

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच शेतकऱ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यातील थल्याचा पाडा येथील शेतकऱ्याचा एकरातील टोमॅटोचा नुसता रेंधा झाला आहे. शेतकऱ्याने खिशात दोन पैसे शिल्लक राहतील म्हणून आपल्या एकरात टोमॅटोची लागवड केली होती, मात्र कोरोनाच्या काळात विक्रीअभावी सर्व माल जाग्यावरच सडून गेला. त्यामुळे शेतकऱ्याचे एक-दोन नव्हे तर तब्बल ५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.

या झालेल्या नुकसानभरपाईची मागणी आता शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांची एकी नसल्याने त्याचा फायदा व्यापारी घेत असून उत्तम दर्जाच्या टोमॅटोला ३० किलोला २०० रुपये भाव देत असून, कमी दर्जाच्या मालाला अवघा १०० रुपये ३० किलोचा दर मिळत आहे. तर बाजारात २५ ते २० रुपये किलो असा दर आहे. मात्र शेतकऱ्यांना फक्त पाच ते सहा रुपये दर मिळत आहे. ‘पिकेल तेथे विकेल’ ही शासनाची योजना आहे, मात्र या ठिकाणी ही योजना केवळ कागदावरच असून व्यापारी एकी करून आपल्या मर्जीनुसारच भाव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

खाऱ्या पाण्यामुळे आणि हवामानात बदल झाल्याने टोमॅटो आणि पालेभाज्या यांना कीड लागत असून यामुळे अन्य पालेभाज्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच बाजारभाव करणारे मध्यस्थी आम्हाला योग्य तो भाव मिळवून देत नसल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे.- सुगंधा जाधव,  महिला शेतकरी, थल्याचा पाडा

Web Title: Red mud of tomatoes in the field due to lack of price; Broker Tupashi starves farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.