पालघरमधील खाड्यांचे रसायनामुळे पुन्हा प्रदूषण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:39 AM2020-06-23T00:39:15+5:302020-06-23T00:39:47+5:30

लॉकडाऊन शिथिल केल्याने पुन्हा प्रदूषित रसायनाचे प्रमाण वाढू लागल्याने पानेरी नदी आणि दांडी-नवापूरच्या खाड्यांतील मासे मरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Re-pollution of creeks in Palghar due to chemicals | पालघरमधील खाड्यांचे रसायनामुळे पुन्हा प्रदूषण

पालघरमधील खाड्यांचे रसायनामुळे पुन्हा प्रदूषण

Next

हितेन नाईक 
पालघर : लॉकडाऊनमुळे कारखाने बंद असल्याने काही कारखान्यांतून समुद्र-खाड्यांमध्ये सोडले जाणारे प्रदूषित पाणी बंद होते. परंतु आता लॉकडाऊन शिथिल केल्याने पुन्हा प्रदूषित रसायनाचे प्रमाण वाढू लागल्याने पानेरी नदी आणि दांडी-नवापूरच्या खाड्यांतील मासे मरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती-मधील कारखान्यांतून निर्माण होणारे प्रदूषित रासायनिक पाणी एमआयडीसीच्या मालकीच्या ज्या सीईटीपी प्रक्रिया केंद्रात जमा केले जायचे, त्याची क्षमता आजही कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त जमलेले प्रदूषित पाणी नि:संकोचपणे परिसरातल्या नदी, नाले, खाड्या आणि शेतात सोडले जात आहे. या वाढत्या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात याचिका दाखल केल्याने काही कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे.
दुसरीकडे माहीमवासीयांनी पानेरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या लढ्यानंतर प्रांताधिकारी पातळीवरून अनेक बैठका पार पडल्यानंतरही पानेरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आजही सुटलेला नाही. २२ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊननंतर पालघरमधील कारखाने बंद ठेवण्यात आल्याने पानेरी नदी प्रदूषणमुक्त होत पुन्हा नदीला गतवैभव प्राप्त झाले होते.
सामाजिक कार्यकर्ते नीलेश म्हात्रे, दीपक भंडारी, अभिनय मोरे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रारी करूनही कारवाईची पावले उचलली जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. १७ फेब्रुवारी रोजी आमदार श्रीनिवास वणगा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, पानेरी प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत पत्र दिल्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर पानेरी नदीमधील प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कुठलीही ठोस भूमिका घेण्यात न आल्याने काही कारखानदारांनी छुप्या मार्गाने आपले प्रदूषित पाणी पुन्हा पानेरीमध्ये सोडण्यास सुरुवात केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे पानेरीच्या पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा घटून मासे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

Web Title: Re-pollution of creeks in Palghar due to chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.