मोखाडा : या तालुक्यातील मोरखडक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या शाळेतील दोन शिक्षकांनी दिलेल्या रजा अर्जाची हजेरी पत्रकात मुख्याध्यापक तुकाराम कोकणी यांनी कोणतीही नोंद केलेली नाही. त्यामुळे त्यांनी या दांडी बहाद्दर शिक्षकांना उत्तेजन दिल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचे भाजपाचे गट नेते दिलीप गाटे उपसभापती मधुकर डामसे यांनी मुख्यध्यापकासह या दोषी शिक्षकांवर कारवाईची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे, काँग्रेसचे जमशेद शेख, मिलिंद झोले, दिलीप गाटे यांनी या शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक शाळेत हजर नव्हते. हालचाल रजिस्टरमध्ये त्यांनी ते खोच ला जाणार असल्याचे नमूद केले होते यावेळी दोन शिक्षक गैरहजर होते. त्यांनी रजेचे अर्ज दिले होते. त्यांची नोंद हजेरी बुकामध्ये करणे आवश्यक होते. त्यावर केंद्र प्रमुखाची शिफारस असणेही आवश्यक होते. परंतु असे काहीच आढळले नाही. त्यामुळे या शिक्षकांना दांडी मारल्यानंतरही हजेरी पुस्तकात स्वाक्षरी करणे शक्य होणार होते.हा प्रकार हेतूपुरस्सर झाल्याचे जाणवत असल्यामुळे अशा दांडीबहाद्दर शिक्षकांना अभय देणाऱ्या मुख्यध्यापकासह शिक्षकांवर कारवाईची मागणी केली जात आहे. नुकतीच येथील केंद्र प्रमुखांसह शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या दांड्यांची अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. (वार्ताहर)
दांडीखोरांना मुख्याध्यापकांचे संरक्षण?
By admin | Updated: February 9, 2017 03:46 IST