पनवेल : खांदा कॉलनीमधील न्यू होरिझोन शाळेतील गौरव कंक (१२) या सहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत बुधवारी पनवेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त शेषराव सुर्यवंशी यांनी तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची झाडाझडती घेतली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजनासंदर्भात मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या. शाळेतील मुलांना गटबाजीपासून रोखले पाहिजे, अशा गोष्टी शिक्षकांनी पालकांच्या त्वरीत निदर्शानास आणून द्याव्यात, असे आवाहन मुख्याध्यापकांना करण्यात आले. शाळेच्या आवारात तंबाखुजन्य पदार्थ, ड्रग्स विक्रीबद्दल माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. शाळेतील खिडक्यांना व धोकादायक ठिकाणी ग्रील बसवण्यात यावे, लिफ्टमन नेमावेत, अपघात टाळण्यासाठी स्कुल बस रस्त्याऐवजी शाळेच्या आवारातच थांबवण्यात याव्यात अशाप्रकारच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. पनवेलचे शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी देखील न्यू हॉरिझोन शाळेवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस उपायुक्त संजय ऐनपुरे, सहाय्यक पोलिस आयुक्त शेषराव सुर्यवंशी,पनवेलचे शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांच्यासह तालुक्यातील ९० पेक्षा जास्त शाळांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पनवेल पोलिसांनी घेतले मुख्याध्यापकांना फैलावर
By admin | Updated: February 26, 2015 01:39 IST