पापलेटने केली आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:54 AM2017-08-18T02:54:02+5:302017-08-18T02:54:18+5:30

पापलेट (सरंगा) खरेदी करणा-या व्यापा-यांनी अचानक पणे किलो मागे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर रुपयाची घट करुन अनेक समस्यांशी झगडत असलेल्या मच्छीमारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम केले आहे.

Pamphlet made economic dilemma | पापलेटने केली आर्थिक कोंडी

पापलेटने केली आर्थिक कोंडी

Next

हितेन नाईक।
पालघर : पापलेट (सरंगा) खरेदी करणा-या व्यापा-यांनी अचानक पणे किलो मागे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर रुपयाची घट करुन अनेक समस्यांशी झगडत असलेल्या मच्छीमारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे मच्छीमारांचा लाखो रु पयांचा होणारा तोटा भरून काढीत त्यांना योग्य भाव मिळवून देण्याचे आव्हान आता सहकारी संस्थाना स्विकारावे लागणार आहे.
संपूर्ण राज्यातील किनारपट्टीवरील सातपाटी हे गाव मत्स्यव्यवसायात पापलेट, दाढा, घोळ आदी माश्यांच्या उत्पादनसाठी अग्रेसर गाव म्हणून सर्वत्र परिचित आहे. दालदा ह्या पारंपरिक मासेमारी पद्धतीने पकडलेल्या माश्यांचे योग्य ते नियोजन करून वेळीच बर्फ मारून ते साठवणूक करण्याच्या पद्धतीमुळे चवीच्या बाबत सातपाटीच्या पापलेट ला विशेष मागणी असते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून सातपाटी मधील मच्छीमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्थांनी व्यापारांसोबत ठरवलेला भाव पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास सर्वच बंदरात लागू होत असे.
मुंबई मधील मत्स्य निर्यात कंपन्यापैकी चिराग इंटरनॅशनल, अल्लाना फिश, कॅस्टॉल रॉक, हरून अँड कंपनी, श्रॉफ इंटरप्रयसेस, चांम फिश या परदेशात मासे निर्यात करणाºया अग्रगण्य कंपन्या पावसाळी बंदी उठण्या पूर्वीच सहकारी संस्थां मध्ये टेंडरसाठी तळ ठोकून रहात असत. दोन्ही सहकारी संस्थांचे संचालक व तांडेल प्रमुख एकत्रपणे उघड टेंडर पद्धतीने भाव ठरवीत आपले सर्व मासे ह्या व्यापारानाच देत असत. मासेमारी हंगामाच्या पहिल्या सहा महिन्यासाठी चा भाव ठरल्यानंतर पुन्हा पावसाळी बंदी पर्यतच्या उर्विरत महिन्यांसाठी वाढीव भाव अश्या दोन हंगामासाठी वेगळावेगळा भाव ठरविले जात असे. ह्यावेळी दोन्ही कडून भावाचे योग्य नियोजन केले जात असल्याने व्यापारी व सातपाटीमधील मच्छीमारामध्ये खूपच जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते.
१ जून ते ३१ जुलै ह्या पावसाळी बंदी कालावधी नंतर समुद्रात निर्माण होणाºया तुफानी लाटा, वादळी वारे ह्यामुळे संपूर्ण समुद्र घुसळला जात असल्याने मत्स्य साठे खोल समुद्रातून ५० ते ७५ नॉटिकल क्षेत्रात सुरक्षित जागेचा आसरा घेत असतात. ही नेमकी जागा शोधून त्यांना आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी समुद्रात पहिले जाण्याची स्पर्धाच किनारपट्टीवरील मच्छिमारा मध्ये लागलेली असते. कारण बंदी उठल्यानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यात मिळणारा पापलेट नंतरच्या सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास दुर्मिळ होत असल्याने पहिल्या हंगामातील प्रत्येक दिवस मच्छिमारांसाठी महत्वपूर्ण ठरत असतो.
पहिल्या फेरीला गेलेल्या नौकाना कमीतकमी ५०० किलो ते जास्तीत जास्त १ हजार किलो पर्यंत पापलेट मिळाले आहेत. त्यामुळे आपल्यावर असलेली बँक, सहकारी संस्था, खाजगी व्यापारी, एनसीडीसीची अनेक वर्षांपासूनची कर्ज फेडून आपल्या जवळ दोन पैसे जमेला ठेवता येतील अशी अपेक्षा ते ठेवून होते.
वर्ष २०१५-१६ ह्यात सुपर पापलेट १३५० रु पये प्रती किलो, एक नंबर ला ११२५ रु , दोन नंबर ला ८४० रु., तीन नंबर ला ६२५ रु , तर चार नंबर पापलेट ला ४१६ रु . चा भाव साधारण पणे व्यापाºयांनी दिला होता. प्रत्येक वर्षी ह्यामध्ये थोडी फार दरवाढ होत असल्याचा शिरस्ता असताना ह्यावर्षी मात्र व्यापारानी प्रथमच मासे खरेदीला नकार देत मागच्या वर्षाच्या तुलनेत वाढ करण्याऐवजी मोठी घट केली आहे. मागच्या वर्षीचे मासे आमचे अजून शिल्लक असून डॉलर चा भाव घसरणे, मासे आयात करणाºया चीनशी दुरावत चाललेले संबंध आदी करणे देत सुपर पापलेट ला ११५० रु .एक नंबर ला ८५० रु , दोन नंबर ला ७०० रु , तीन नंबर ला ५०० रु व चार नंबर ला ३०० रु पये असा भाव खरेदीला आलेल्या दोन कंपनीनी दोन्ही सहकारी संस्थांना दिला.
प्रत्येक नौकाना मोठ्या प्रमाणात मासे मिळाल्याची माहिती काही लोकांनी आधीच ह्या व्यापाराना दिल्याने मच्छीमारांची कोंडी करण्याची आयती संधी व्यापारांना मिळाल्यानेचे व्यापारानी पूर्वी दिलेल्या भावात अजून घसरण करून संस्थांची आर्थिक कोंडी केल्याची चर्चा आहे.
>मच्छिमारांना चांगला दर मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशिल असतो.
- संतोष मेहेर, चेअरमन,
मच्छीमार सहकारी संस्था
>पापलेट परदेशामध्ये निर्यात होतो. चायना मार्केट सध्या डाऊन असल्याने तसेच डॉलरचा भाव घसरल्याने आम्हाला पापलेटचे दर कमी करावे लागले.
- कर्सन भाई, स्यालेट एक्सपोर्ट फिश
>छोटे मासे निर्यात होत नाहीत. जुना माल शिल्लक आहे. डॉलर घसरला आहे. अशी कारणे पुढे करुन व्यापाºयांनी आम्हाला कोंडीमध्ये पकडले आहे.
- रविंद्र म्हात्रे, चेअरमन, सर्वाेदय सहकारी संस्था.

Web Title: Pamphlet made economic dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.