वाडा: वाडा आगाराचे बसस्थानक गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मध्यवर्ती भागात आहे,ते गेल्या चार पाच दिवसांपासून नव्या जागी स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र हा निर्णय प्रवाश्यांच्या गैरसोयीचा असल्याने त्याबद्दल प्रवाश्याना संताप व्यक्त केला होता. हा निर्णय रद्द करून पुन्हा बससेवा जुन्याच स्थानकावरून सुरु करण्यात आल्याचे दिसत आहे.प्रांत कार्यालयात काही राजकीय नेते, पोलीस व एसटी महामंडळ यांनी एकत्र बैठक घेऊन शहरातील होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरातील बस स्थानक मनोर- वाडा महामार्गावरील वाडा आगारा जवळ असणाऱ्या स्थानकातून सुटतील असा निर्णय घेण्यात आला. कुठलीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयाने प्रवासी व विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली होती. त्यातच नवीन स्थानक शहरापासून जवळपास दीड किमी अंतरावर असून त्या ठिकाणी जाण्यासाठी वृद्ध प्रवासी, विद्यार्थी व गरोदर महिलांना मोठा त्रास झाला.याचबद्दल वृत्त मंगळवारी प्रसिद्ध होताच याची तात्काळ दखल घेत गेल्या काही दिवस सुरु असणाऱ्या या फरफटीला पूर्ण विराम देऊन बस स्थानक स्थलांतराचा विषय स्थगित करण्यात आल्याचे समजले आहे. शिवाय सायंकाळ पासून सर्व बस शहरातील जुन्या स्थानकात येणे सुरु झाले आहे. (वार्ताहर)
गैरसोयीमुळे वाडा बस स्थानक जुन्याच ठिकाणी
By admin | Updated: March 25, 2017 01:09 IST