लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : ऑनलाइन गेम खेळण्यास पावणेदोन लाख रुपये देण्यास नकार देणाऱ्या आईचा सावत्र मुलाने डोके आपटून खून केला. मुलाने केलेली खुनाची घटना व पुरावे पुसून टाकण्यास त्या महिलेच्या पतीने मदत केल्याची घटना वसईत उघडकीस आली आहे. आशिया खुसरू (६१) असे महिलेचे नाव असून, पोलिसांनी आरोपी पतीसह सावत्र मुलाला अटक केली.
वसईच्या पेरियार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आशिया खुसरू (६१) ही महिला राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता पतीने जवळच्या नातेवाइकांसह परस्पर अंत्यविधी केला. ही माहिती रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक समीर अहिरराव यांना समजली.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून गुन्ह्याची उकल
पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून महिला आशिया खुसरू (६१) यांचा सावत्र मुलगा मो. इम्रान खुसरू (३२) याला ताब्यात घेतले. मो. अमिर खुसरू (६५) यांनी मुलाने केलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घटनास्थळी सांडलेले रक्त पुसून पुरावा नष्ट केला. घरातील फरशीवर पडल्यामुळे तिच्या डोक्याला झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचा बनाव करून परिचयाच्या डॉक्टरांकडून मृत्यू प्रमाणपत्र घेतल्याची माहिती सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली.