मीरारोड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशा नुसार राज्यातील सर्व शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये ७ कलमी १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयां मध्ये सर्वोत्कृष्ट ठरले आहे. आयुक्तालयास १०० पैकी ८४.५७ गुण मिळाले आहेत.
पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त मुख्यालय डॉ. सुहास बावचे, गुन्हे शाखा उपायुक्त अविनाश अंबुरे, मीरा भाईंदर उपायुक्त प्रकाश गायकवाड, वसई परिमंडळ २ उपायुक्त पौर्णिमा चौगुले - श्रींगी , विरार परिमंडळ ३ चे उपायुक्त जयंत बजबळे सह पोलीस अधिकारी, अंमलदार आदींनी विविध उपक्रम राबवले.
पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळ हे नागरिकांना वापरण्यास सुलभ, आवश्यक माहिती सहज मिळेल असे अद्यावत केले. मीरा भाईंदर मधील सर्व पोलीस ठाणी व कार्यालये स्मार्ट आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त बनवली. पोलिसांच्या बद्दलचा अनुभव तात्काळ व सहज वरिष्ठां पर्यंत देता यावा म्हणून नागरिकांना पोलीस ठाण्यात क्यूआर कोड यंत्रणा उपलब्ध केली.
जुनी बेवारस वाहने काढून, स्वच्छता, सुशोभीकरण करण्यासह परिमंडळ ३ विरार मधील सर्व पोलीस कार्यालय व शाखा कार्यालय नवीन अद्यावत केली. आयुक्तालयातील सर्व कार्यालयात १०० टक्के ई ऑफिस कार्यप्रणाली सुरु केली. युनिसेफच्या विद्यमाने बालरक्षा अभियान सुरू केले. सायबर गुन्हे रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात २४ तास स्क्रीनवर माहिती उपलब्ध केली. ७ वर्षावरील गुन्ह्यात घटनास्थळावरून फॉरेन्सिक नमुने घेण्यासाठी प्रत्येक परिमंडळात १ अश्या ३ आय बाईक सुरु केल्या. एआयचा वापर करून सीसीटीव्ही कॅमेरा द्वारेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली.