- मंगेश कराळे नालासोपारा - प्रगती नगर या परिसरातून तुळींज पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. हा कारखाना चालवणाऱ्या एका आरोपी नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनास्थळावरून पोलिसांनी ५ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नालासोपाऱ्यात ड्रग्स मोठ्या प्रमाणात तयार होत असून, विक्रीदेखील होत असल्याचे समोर आले. एका इमारतीमध्ये घरात ड्रग्सचा कारखाना सापडल्याने वसईत खळबळ माजली आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नालासोपारा ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याचे अनेक वेळा समोर आले. या अगोदर देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून नालासोपारा भागात ड्रग्स विरोधात अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत.
तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांना मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातील अंशीत प्लाझा या इमारतीच्या रूम नं. ४०५ या ठिकाणी छापेमारी केली आहे. त्या घरात चक्क ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी घटनास्थळी आरोपी नायजेरियन महिला रिटा कुरेबेवाई (२६) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या घरातून मेफेड्रोन ड्रग्स बनवण्याकरिता लागणारा कच्चा माल, ड्रग्स बनवण्याचे साहित्य असे एकूण ५ कोटी ६० लाख ४० हजार १५० रुपये इतका मुद्देमाल पोलिसांकडून जप्त केला आहे. आरोपी नायजेरियन महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तर तिला सहकार्य करणारा मुख्य सूत्रधार तिचा प्रियकर फरार असून तुळींज पोलीस शोध घेत आहे.
अटक केलेल्या आरोपी महिलेकडे भारतामध्ये वास्तव करण्यासाठी आवश्यक असलेला व्हिजा आढळून आलेला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ड्रग्सच्या जाळ्यात युवा पिढी मोठ्या प्रमाणात अडकली आहे. कॉलेजच्या युवांपासून ते अभिनेत्यापर्यंत ड्रग्स सेवन करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. पोलीस आयुक्तालयामधील नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांची संख्या आहे. ड्रग्स तयार करून विक्री करत असल्याचे अनेक नायजेरियन लोकांना या अगोदर देखील गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस पथकाने ड्रग्सचा कारखाना उध्वस्त केला. या कारवाईत ५ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका नायजेरियन महिलेला अटक केली असून एक आरोपी फरार आहे. आरोपीचा शोध घेत पुढील तपास करत आहे.- विजय जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)