भिवंडी : राज्यात मराठी चित्रपट व्यवसायाचे विक्रम मोडीत असताना शहरातील चित्रपटगृहात मराठी चित्रपट लावले जात नाही. त्यामुळे शहरातील सिनेरसिकांना शहराबाहेर जाऊन ते पाहावे लागत आहेत. याबाबत मराठीच्या नावाने गळा काढणाऱ्यांनी मात्र चुप्पी साधली आहे.शहरात एकूण १५ चित्रपटगृहे असून या चित्रपटगृहांत हिंदी, तेलुगू, भोजपुरी व इंग्रजी चित्रपट लावले जातात. प्रत्येक चित्रपटगृहाने इतर भाषिक चित्रपट लावत असताना वर्षातून किमान तीन आठवडे मराठी चित्रपट लावावेत, असे निर्देश दिले आहेत. असे असताना स्थानिक चित्रपटगृहांच्या मालकांची मानसिकता बदललेली नाही. शहरातील पायल व झंकार चित्रपटगृहांत भोजपुरी चित्रपट लावल्यानंतर ते चालण्यासाठी भोजपुरी कलाकारांना चित्रपटगृहात आणले जाते. पद्मानगर येथील आशीष व गणेश या तेलुगू चित्रपटगृहांत विशेष चित्रपटांच्या वेळी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तेलुगू कलाकारांना आणले जाते. काही हिंदी चित्रपटांच्या प्रीमिअरसाठीदेखील चित्रपटांतील नायक-नायिकांना आणण्याचे प्रयोजन चित्रपटगृहाच्या मालकांनी केले आहे. मात्र, मराठी चित्रपटांसाठी अशा प्रकारे कोणत्याही चित्रपटगृहाच्या मालकाने प्रयत्न केलेला नाही.या प्रकरणी मराठी भाषेच्या नावाने नेहमी गळा काढणारे पुढारी कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नाहीत.
मराठी चित्रपटांचे वावडे
By admin | Updated: January 8, 2016 01:56 IST