- आरिफ पटेल, मनोरग्रामीण भागातील आदिवासी रूग्णांसाठी वरदान ठरणारे ग्रामीण रूग्णालय ऐन पावसाळ्यात पाच दिवसापासून ओस पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या रूग्णांना उपचाराविना परत जावे लागत आहे. एकही वैद्यकीय अधिकारी, नर्स व इतर कर्मचारी नसल्याने रूग्णालय ओस दिसत आहे.शासनाने पालघर तालुक्यातील ७० ते ७५ गावामधील रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून कोट्यावधी खर्च करून ५० खाटांचे मनोर रूग्णालय तयार केले. त्यामध्ये सुरूवातीला वैद्यकीय अधिक्षक तीन डॉक्टर्स, नर्स, क्लार्क अशी अनेक पदे भरली होती. १०० ते १२५ रूग्णांची ओपीडी चालत होती. काही रूग्णांना उपचारासाठी दाखलही करून घेतले जात होते. परंतु आता परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या पाच दिवसापासून एकही वैद्यकीय अधिकारी, नर्स व कर्मचारी मिळत नाही. त्यामुळे येणारे रूग्णांचे प्रचंड हाल झालेले आहेत. गोरगरीब रूग्णांना आपल्या आजारावर उपचार करणे अशक्य झाले आहे.याबाबत काही रूग्णांनी मंगळवारी मनोर ग्रामपंचायतीला भेट देऊन सांगितले की, रुग्णालयात एकही डॉक्टर तसेच कर्मचारी नाही. त्यावेळी मनोर ग्रामपंचायत सरपंच संतोष माळी, उपसरपंच मोमेज रईस, सदस्य अनंत पुजारा, केतन पाडोसा व इतर सदस्य तसेच ग्रामस्थ अब्दुल पठान इकबाल चिखलेकर, बिलाल रईस रूग्णालयाला भेट दिली तसेच तातडीने सिओ, जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन डी. एच. ओ यांना पत्र लिहून लवकरात लवकर ग्रामीण रूग्णालय सुरू करून रूग्णाचे हाल थांबवावे, अशी विनंती केली.
मनोरची रुग्णसेवा ‘अत्यवस्थ’
By admin | Updated: September 8, 2015 23:25 IST