वसई : नुकत्याच झालेल्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणामध्ये वसई तालुक्यावर अन्याय झाल्याचा आरोप वसई पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील यांनी केला आहे. वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने नावे पाठवूनही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हेतुपुरस्सर डावलले. याची चौकशीची मागणी त्यांनी या वेळी केली.आदर्श शिक्षक पुरस्कार देताना वसईवगळता इतर सर्व तालुक्यांतून आलेल्या नावांचा विचार करण्यात आला. वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आपल्या तालुक्यातील नावे जिल्हा परिषदेकडे पाठवली होती. परंतु, ही सर्व नावे डावलण्यात आली. यासंदर्भात सध्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुरेश कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नावे पाठवण्यात आली होती, परंतु निवड करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे असल्यामुळे आम्हाला निवड प्रक्रियेबद्दल काहीही माहीत नाही, अशी प्रतिक्रिया लोकमतकडे नोंदवली. (प्रतिनिधी)
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारात वसईवर अन्याय
By admin | Updated: September 10, 2015 00:40 IST