- मंगेश कराळे नालासोपारा - पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरणाऱ्या आरोपी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी पुण्याच्या हडपसर येथील म्हाडा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेत हत्येच्या गुन्ह्याचा २४ तासांत छडा लावण्यात यश मिळाले आहे. आरोपींना जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून लवकरच दोघांना पेल्हार पोलिस ठाण्यात घेऊन येणार आहे. आरोपी पत्नीजवळ तिचे लहान बाळही भेटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हत्येचा गुन्हा करणाऱ्या आरोपींना पकडण्याचे खूप मोठे आव्हान पेल्हार पोलिसांच्यासमोर होते. हत्येच्या आरोपींना पकडण्यासाठी विरार गुन्हे शाखा, मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि पेल्हार पोलिसांच्या टीम आरोपींच्या मागावर होत्या. आता या आरोपींनी विजयची नेमकी हत्या का व कोणत्या कारणामुळे आणि कशाप्रकारे केली याचा उलगडा होणार आहे.
काय होती नेमकी घटनाधानीवबागच्या गांगडीपाडा येथील ओम साई वेल्फेअर सोसायटीत राहणाऱ्या विजय चौहान (३४) यांची त्यांची पत्नी चमन देवी (२८) आणि प्रियकर मोनू शर्मा (२०) याच्या मदतीने निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुरला होता. धक्कादायक म्हणजे मृतदेह पुरल्यावर त्यावर नवीन टाईल्स देखील लावण्यात आल्या होत्या. हा प्रकार १५ दिवसांनी उघड झाला आहे. विजयचा शोध घेऊनही काही पत्ता लागत नसल्याने शेवटी त्याचा भाऊ अखिलेश चौहान (२४) याने रविवारी रात्री पेल्हार पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती.