वसई : येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. विरार येथील डोंगरावर वसलेल्या जीवदानी माता मंदिरामध्ये नऊ दिवस विविध अध्यात्मिक उपक्रम राबवण्यात येतात. नवसाला हमखास पावणारी देवी म्हणून ओळख असणाऱ्या जीवदानी मातेच्या मंदिराला वर्षाकाठी कोट्यावधी भाविक भेट देत असतात. या मंदिराचे व्यवस्थापन विश्वस्त मंडळातर्फे पाहण्यात येते. विरारची जीवदानी देवी ही पालघर, ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असून दररोज हजारो भाविक १३०० पायऱ्या चढून या देवीचे दर्शन घेतात. नवरात्रोत्सवात या मंदिरातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन होते. काही वर्षापूर्वी या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. दर्शनासाठी येणाऱ्या वृद्धांचे हाल लक्षात घेऊन विश्वस्त मंडळातर्फे डोंगरावर जाण्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. घटस्थापनेदिवशी विविध आध्यात्मिक कार्यक्रमास सुरूवात होते. जीवदानी देवीमुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. डोंगरावर असलेले फुलविक्रेते, व्यापारी व रिक्षाचालकांचा येणाऱ्या भाविकांमुळे बऱ्यापैकी व्यवसाय होत असतो. या मंदिराची संपूर्ण जबाबदारी ठाकूर कुटुंबियांकडे असून या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आजवर कोट्यावधी खर्च करण्यात आले आहेत. गरजू नागरीकांसाठी न्यासातर्फे परिसरात वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात. पाटील कुटुंबियांतर्फे ४ वर्षापूर्वी फिरत्या दवाखान्याकरीता वैद्यकीय वाहने दिली होती.
भाविकांचे श्रद्धास्थान जीवदानी देवी
By admin | Updated: October 15, 2015 01:29 IST