- मंगेश कराळे नालासोपारा - मोबाईल टॉवरचे सर्व्हर रुममधील बॅटरी चोरी करून त्या विक्री करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे.
भालिवली गावात लावण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या कॅबिन रूममधील इलेक्ट्रीक बॅकअप करीता असलेल्या एकूण २४ बॅटरी (अंदाजे किंमत १२ हजार रुपये) ५ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास चोरट्याने कॅबिनचे लॉक तोडून चोरून नेल्या होत्या. मांडवी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आयुक्तालय परिसरात मोबाईल टॉवरचे सर्व्हर रूममध्ये बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट इत्यादी साधनांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने वरिष्ठांनी गांभीर्य लक्षात घेऊन अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्यांचे तांत्रिक विश्लेषण व बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी अजित मानकर (३२), संतकुमार राजभर (४१), आकाश पांडे (२९), नवनाथ उत्तेकर (३२), अजय घाडी (२४), सुदीप राजभर (३०), बुल्लू राजभर (३७) हे व सदरचा चोरीचा माल खरेदी करणारे भंगार व्यवसायिक रमेश सिंग (३७) आणि किशोर पुरबिया (३७) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपुस केल्यावर सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना विरार आणि मांडवी पोलिसांकडे हजर करण्यात आले आहे. या आरोपींनी वसई, विरार, पालघर, वाडा, बोईसर इत्यादी परिसरात गुन्हे केले आहेत. आरोपींकडून ६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोनि धनंजय पोरे, सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी उमेश भागवत, सफौ. अशोक पाटील, पोहवा मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, सुनिल पाटील, मनोहर तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.