- मंगेश कराळे नालासोपारा - २०१६ साली अर्नाळा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिची हत्या करत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या चारही आरोपींना वसई न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कविता बडाल (२७) हिने मार्केटिंगच्या कामासंदर्भात मिटींग कामी १५ मे २०१६ रोजी ग्लोबल सिटी, विरार येथे जात असल्याचे घरात सर्वांना सांगुन गेली होती. ती घरी परत आली नसल्याने घरच्यांनी १६ मे रोजी अर्नाळा पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग दाखल करण्यात आली होती. १७ मे रोजी पहाटे तिचे वडील किशनलाल कोठारी यांच्या फोनवर मुलगी कविता हिच्या मोबाईल नंवरवरुन फोन आला. परंतु फोनवरुन आरोपीने मुलगी व्यवस्थित पाहिजे असेल तर ३० लाख रुपये आणि ३ किलो सोने पाहिजे अशी खंडणी मागितली. परत साडे दहाला फोन करेन व जागा सांगेल असे सांगितले. पुन्हा दुपारी १२.५५ वाजता आरोपीने फोन करून रोख रक्कम व सोने घेऊन सुरतच्या दिशेने येण्यासाठी सांगितले. तसेच गाडीने निघ व गाडीचा नंबर एसएमएस करून दीड तासात पोहोचला पाहिजे असे सांगून जास्त हुशारी केली तर मुलीचा मृतदेह मिळेल अशी धमकी दिली. अर्नाळा पोलिसांनी यानंतर आरोपींवर खंडणी, अपहरण या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.
आरोपी मोहितकुमार भगत (२५), रामअवतार शर्मा (२६), शिवा शर्मा (२५) या तिघांना महामार्गावरील खानिवडे टोल नाका येथे १९ मे २०१६ रोजी अर्नाळा पोलिसांनी सापळा रचून खंडणीचे पैसे घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर या तीन आरोपींची साथीदार महिला युनिता शरवंदन (२५) हिलाही अटक करण्यात आली होती. यानंतर हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला होता. या चारही आरोपींनी गुन्ह्याचा कट रचून कविता हिच्यासोबत आर्थिक वादातून झालेल्या कारणावरून तिचा गळा दाबून तिला जिवे ठार मारुन तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने बॅगेत भरून वानगाव येथे घेवून जावुन जाळुन पुरावा नष्ट केला होता. अर्नाळ्याचे तत्कालीन तपास पोलीस अधिकारी के. डी. कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले, पोलीस नाईक मंदार दळवी, पोलीस हवालदार मुकेश पवार यांच्या पथकाने सखोल तपास करून भक्कम पुरावे गोळा केले होते. वसई न्यायालयात हे पुरावे सादर करण्यात आले होते. पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी वकील जयप्रकाश पाटील, तत्कालीन पोलीस अधिकारी के डी कोल्हे यांचा मोलाचा वाटा आहे.
योग्य पुरावे, पोलिसांनी केलेला तपास यामुळे दोषी चारही आरोपींना वसई न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.- जयप्रकाश पाटील, (सरकारी वकील, वसई)
आमच्या टीमने या गुन्ह्याच्या प्रकरणी योग्य तपास करून योग्य कागदपत्रे, पुरावे वसई न्यायालयात सादर केले होते. यामुळे न्यायालयाने दोषी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. - के डी कोल्हे (तपास अधिकारी)