नालासोपारा : वसई-विरारमध्ये मंगळवारी सकाळी ईडीने १६ ठिकाणी छापे टाकले. यात शहरातील आर्किटेक्ट आणि पालिका अभियंंत्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात केलेल्या या कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडीने जाहीर केलेला नाही. मात्र, नालासोपाऱ्यातील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात पालिकेचे माजी नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ईडीने १४ मे रोजी देखील वसई-विरारमध्ये छापे टाकले होते. या मोहिमेत सर्वांत मोठे घबाड वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबादमधील घरात सापडले. त्यावेळी ८.६ कोटींची रोख रक्कम तसेच २३.२५ कोटींचे हिरेजडित दागिने तसेच सोने व चांदी जप्त करण्यात आली होती. रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आली कुठून, याचा ईडीकडून तपास सुरू असताना यात पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग उघड झाला होता.
ईडीने जप्त केलेल्या दस्तऐवजांतून पालिकेतील भ्रष्टाचाराचे मोठे जाळे उघडकीस आले. त्याच माहितीच्या अनुषंगाने मंगळवारी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती आहे.
मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ईडीने अचानक या प्रकरणातील संबंधित आर्किटेक्ट आणि नगररचना विभागातील अभियंत्याच्या घरी व कार्यालयात छापे टाकले. इमारतींंना परवानगी देण्यासाठी आर्किटेक्टच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केला असल्याचा आरोप आहे. रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर अनेक आर्किटेक्ट परदेशात निघून गेले होते.
नालासोपाऱ्याच्या अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर ईडीने या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. या अनधिकृत इमारती माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याने बांधल्या होत्या.
पालिकेचे अधिकारी आणि तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती. त्यानुसार ईडी पाठपुरावा करत होती.