शौकत शेख / डहाणूमुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेल्या डहाणू पोलिस ठाण्यात २०११ च्या जनगणनेनुसार १५० पोलिस कर्मचारी व अधिकारी यांची आवशयकता असतांनादेखील केवळ ६५ पोलिस या पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे चोरी, घरफोडी, बलात्कार चैन स्नेचिंग, हाणामारी, खून यात वाढ झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.डहाणू पोलिस ठाण्याअंतर्गत २०११ च्या जनगणनेनुसार २९ गावे येत असून या गावांची लोकसंख्या एक लाख दहा हजार झाली आहे. येथील पोलिस ठाण्यात ११७ पदे मंजूर आहेत त्यात पोलिस नाईक, सहाय्यक फौजदार, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचा समावेश आहे. मात्र गेल्या पाच, सहा वर्षांपासून केवळ ६५ पोलिस असल्याने त्यांना अहोरात्र कार्यरत रहावे लागत असल्याने ते तणावाचे बळी ठरले आहेत. अशातच नगरपरिषदेची निवडणूक जवळ आल्याने त्यांच्यावरील ताण अधिक वाढणार आहे. वर्षभरात सव्वाशे ते दीडशे गुन्हयांची नोंद होत असलेल्या या पोलिस स्टेशनमधे अपुरे पोलिस असले तरी अनेक गुन्ह्यांची उकल करून पोलिस चांगली कामिगरी बजावत आहेत. सरावली येथील बिपिन पांचाळ यांच्या कारखान्यात रात्रीच्या सुमारास पाच लाखांची तांब्याची कॉइल चोरणाऱ्या तीन आरोपीला मुद्देमालासह अटक केल्या बरोबरच डहाणू शहरात घरफोडि करणाऱ्या तीन सराइत गुन्हेगाराना तसेच नरपड येथे घरफोडि करणाऱ्या आरोपीलाही चार तासात पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे पोलिस उपनिरीक्षक विजय गोडसे यांनी गजाआड केले आहे.
डहाणूची सुरक्षा ६५ पोलिसांवर
By admin | Updated: March 24, 2017 00:53 IST