डहाणू-विरार चौपदरीकरण प्रकल्प सापडला अडचणीत; २०२५ साल उजाडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:36 AM2020-10-13T01:36:38+5:302020-10-13T01:36:59+5:30

३२.७८ पैकी केवळ ०.३४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण

Dahanu-Virar quadrangle project found in trouble; The year 2025 is expected to dawn | डहाणू-विरार चौपदरीकरण प्रकल्प सापडला अडचणीत; २०२५ साल उजाडण्याची शक्यता

डहाणू-विरार चौपदरीकरण प्रकल्प सापडला अडचणीत; २०२५ साल उजाडण्याची शक्यता

googlenewsNext

हितेन नाईक

पालघर : डहाणू-विरार पट्ट्यातील दैनंदिन प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा डहाणू-विरार मार्ग चौपदरीकरण प्रकल्प अडचणीत सापडला असून जिल्ह्यातील एकूण ३२.७८ हेक्टर जमिनीपैकी फक्त ०.३४ हेक्टर जमीनच भूसंपादन करण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास बहुदा २०२५ साल उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विरार-डहाणू मार्गादरम्यान एकाच मार्गिकेवर अप-डाऊन लोकल आणि मेल-एक्सप्रेस फेऱ्या एकत्रितपणे सुरू आहेत. त्यामुळे मेल, एक्सप्रेस गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी डहाणू-विरार दरम्यानच्या लोकल, पॅसेंजर गाड्यांना साईडला ठेवण्यात येत असल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. या प्रकल्पपूर्तीनंतर लोकल आणि मेल-एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचा समावेश असलेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने तब्बल ५० कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मध्यंतरी निधी उभारणी आणि भूसंपादनातील अडचणींमुळे हा प्रकल्प काही काळासाठी खोळंबला होता.

मुंबई शहर परिवहन प्रकल्प-३ एमयूटीपी-३ अंतर्गत विरार-डहाणू मार्ग प्रकल्पाचा समावेश असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. भूसंपादन आणि निधीचा अडथळा दूर झाल्यानंतर या प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याची आवई उठविण्यात आली असली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न दिल्याने शेतकरी हक्क संघर्ष समितीने उभारलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाला भूसंपादन करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यातील वसई ते डहाणू दरम्यानच्या ३० गावांतील ३२.७८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करणे अपेक्षित असताना २०२० पर्यंत प्रशासनाला फक्त ०.३४ हेक्टर जमिनीचेच भूसंपादन करणे शक्य झाले आहे. आता ही मुदत वाढवून २०२१ करण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ६४ कि.मी. लांबीचे रुळ टाकण्यात येणार असून प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असलेल्या वैतरणा नदीवर पूल भरणे, त्या नदीवर ४२४ मीटर आणि ४७७ मीटरचे दोन पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते, तसेच १६ मोठे पूल आणि संस्थेच्या लहान पूल असे एकूण ८५ पुलांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होतो.

उपनगरीय गाड्यांच्या कमतरतेमुळे दैनंदिन रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांना नव्याने थांबे मिळण्यास रेल्वे प्रशासनाकडून होणारी दिरंगाई याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून रेल्वे प्रशासनाकडून या चौपदरीकरणाच्या प्रकल्पाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. - हितेश सावे, जनसंपर्क अधिकारी, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

प्रवाशांना दिलासा
मुंबई शहर परिवहन प्रकल्प-३, एमयूटीपी-३ अंतर्गत विरार-डहाणू मार्ग प्रकल्पाचा समावेश असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. या प्रकल्पपूर्तीनंतर लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: Dahanu-Virar quadrangle project found in trouble; The year 2025 is expected to dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.