नालासोपारा (मंगेश कराळे) :- लाखोंचे सोन्याचे दागिने लग्नासाठी वापरून परत देते असे सांगून मैत्रिणीकडून दागिने घेऊन पळून जाणाऱ्या जोडप्याला आचोळे पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली आहे. या जोडप्याकडून ११ लाखांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
एव्हरशाईनच्या नेमिनाथ टॉवर येथे राहणाऱ्या सुनंदा कुकडाल (६४) यांच्यासोबत मैत्री करून अंजु (५७) व तिचा पती सुरेश रेड्डी (६७) यांनी विश्वास संपादन करून ८ लाख ६१ हजार ९१४ रुपये किमतीचे २३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नातेवाईकांचे लग्न कार्यामध्ये वापरून परत देते असे सांगुन घेऊन ते परत न करता अपहार करून फसवणुक केली होती. आचोळे पोलिसांनी २० एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान आरोपींनी इतर साक्षीदार यांचेकडून विश्वासाने सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी सुमारे २४ लाख ३५ हजार ३६५ रुपयांची कमवणूक केली असल्याचे निदर्शनास आले. आरोपी हे फसवणूक करुन कोणाला काहीएक न सांगता त्यांचे राहते घर सोडून पळून गेले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून हा गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे पाहिजे आरोपींचा शोध घेत होते.
या गुन्यातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे शोध घेत ते कर्नाटक राज्यातील गांधीनगर येथे स्वतःचे अस्तित्य लपवून वास्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तेथे जाऊन आरोपी अंजु (५७) आणि तिचा पती सुरेश (६७) यांना अटक केली. अटक आरोपीकडे तपास करीत असताना त्यांनी लोकांची फसवणुक करुन घेवून गेलेल्या सोन्याचे दागिन्यातील काही दागिने कर्नाटक विकास ग्रामीण बैंक, शाखा गांधीनगर येथे गहाण ठेवले असुन काही दागिने विक्री केल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपीकडून ११ लाख ७ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि यशपाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे, पोलीस हवालदार दत्तात्रय दाईंगडे, शंकर शिंदे, निखिल चव्हाण, विनायक कचरे, अमोल सांगळे, किसन जायभाय, मनोज पाईकराव, गणेश साळुंखे, आरती पावरा, सुजाता लोंढे, अमोल बरडे यांनी केली आहे.