पालघर : डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील सुकट आंबा (शिरसून पाडा) येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम कोसळून सोमवारी झालेल्या दुर्घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून, एक मुलगी जखमी झाली आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत सध्या पालघर जिल्ह्यातील ८९९ गावांपैकी ६१४ गावांत पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत कामे सुरू आहेत. सोमवारी, दि. १७ मार्च रोजी संध्याकाळी चळणी ग्रामपंचायतीअंतर्गत जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या एका टाकीवर काही मुली खेळत असताना टाकीचा भाग अचानक कोसळल्याने सुमारे २५ ते ३० फुटांवरून खाली कोसळून झालेल्या अपघातात इयत्ता सातवी इयत्तेमधील हर्षला बागी आणि संजना राव या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी या अपघातात जखमी झाली असून, तिचा जीव थोडक्यात बचावला आहे.
ठेकेदाराने या टाकीचे काम करताना सुरक्षिततेची पुरेशी काळजी न घेतल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या दुर्घटनेत ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.