पालघर : समुद्रामध्ये एमआयडीसीची पाईपलाईन टाकण्याच्या कामावेळी खोदलेल्या ढिगाºयावर आदळून अपघातग्रस्त झालेल्या बोटींसह त्यांच्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईचा मोबदला मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर पोफरण-दांडी, उच्छेळी व नवापूरच्या तीन सहकारी संस्थांचा २ कोटी ४१ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव मत्स्यव्यवसाय विभागाने तारापूर औद्योगिक विकास महामंडळ उपअभियंत्यांकडे पाठविला आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातून निघणाºया प्रदूषित, रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करून ते नवापूर समुद्रात ७.१ कि.मी. आत सोडण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येणार असून दीड वर्षापूर्वी समुद्रात पाईपलाईन टाकण्याचा ठेका घेतलेल्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ठाणे यांनी समुद्रात उत्खनन करताना फोडण्यात आलेले मोठमोठ्या खडकांचा, मातीचा ढीग समुद्रात टाकण्यात आला होता. या पाण्याखाली असलेल्या ढिगाऱ्यांवर कुठलीही मार्गदर्शक चिन्हे ठेकेदारांनी लावलेली नसल्याने नवापूर, उच्छेळी, दांडी गावातील अनेक बोटींना अपघात होऊन त्यांचे नुकसान झाले होते. या कामामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नवापूर, उच्छेळी-दांडी येथील मच्छीमारांनी आपल्या ६० ते ७० नौकांद्वारे मच्छीमार महिलांनी २८ नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबियांसह थेट समुद्रात घुसून घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले होते. ‘पहिले नुकसान भरपाईचे बोला, नंतरच काम सुरू करा’ असे बजावल्यानंतर ठेकेदाराला काम बंद करणे भाग पडले होते.जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मासेमारीसाठी समुद्रात न जाता येणे, खलाश्यांचे वेतन, डिझेल खर्च, दैनंदिन खर्च, आदी नुकसान भरपाईपोटी एकूण २ कोटी ९१ लाख रुपयांची मागणी संस्थांद्वारे करण्यात आली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने अजिंक्य पाटील, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त ठाणे, पालघर यांनी सहकारी संस्थांना भेट देऊन नवापूर-दांडी खाडीची पाहणी केली.पोफरण-दांडी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेने आपल्या ८४ नौकांच्या नुकसानीपोटी १ कोटी ७५ लाख २६ हजार रुपये, नवापूर मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या १३ मच्छिमार नौकांचे २८ लाख ६६ हजार ५०० रुपये तर उच्छेळी मत्स्योद्योग विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या ११ नौकांचे २० लाख ४७ हजार ५०० रुपये अशा एकूण २ कोटी ९१ लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी काय भूमिका घेते याकडे नुकसानग्रस्त मच्छीमारांचे लक्ष लागले आहे. नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यास समुद्रात पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असे दांडी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तामोरे, माजी जि.प. सदस्य तुळशीदास तामोरे, अभामा समितीचे कुंदन दवणे, विजय तामोरे, दशरथ तामोरे, राजेंद्र पागधरे, परेश पागधरे आदींनी सांगितले.मच्छीमारांच्या संस्थांशी चर्चा करून २ कोटी ४१ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.समुद्रात बोटीत जाऊन पाइपलाइनचे काम बंद पाडण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह गेलेल्या मच्छीमार महिला.
नुकसान झालेल्या ‘त्या’ मच्छीमारांना मिळणार भरपाई?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:01 IST