थंडी वाढल्याने डहाणूत आंबा कलमे मोहरण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:14 PM2019-12-16T23:14:31+5:302019-12-16T23:17:24+5:30

पोषक वातावरण : कृषी विभाग मोहर संवर्धन कार्यक्र म आखणार

As the cold grew, the mango streams began to flow | थंडी वाढल्याने डहाणूत आंबा कलमे मोहरण्यास सुरुवात

थंडी वाढल्याने डहाणूत आंबा कलमे मोहरण्यास सुरुवात

Next

अनिरु द्ध पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू/बोर्डी : तालुक्याील वातावरणात थंडीची तीव्रता वाढत असल्याने आंबा कलम मोहरण्यास प्रारंभ झाला आहे. लांबलेला पाऊस आणि चक्रीवादळाच्या प्रभावाने मोहोरावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत असताना अनुभवी बागायतदारांनी डिसेंबरच्या मध्यावर मोहर येण्याची शक्यता वर्तवली होती. त्याचबरोबर कृषी विभागाकडून ‘मोहर संवर्धन’ कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे. दरम्यान, यंदाही पोषक वातावरण मिळाल्यास ३० एप्रिल ते मेच्या पहिल्या आठवड्यात बाजारात फळे येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.
उत्तर कोकणातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यांमध्ये डिसेंबर प्रारंभापासून आंबा कलम मोहरण्यास सुरुवात होते. यंदा लांबलेला पाऊस आणि चक्रीवादळामुळे आंबा मोहरावर परिणाम होऊन मोहरण्याची क्रिया उशिरा सुरू होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र सीमा भागातील या तालुक्यांमध्ये आंबा कलमे मोहरलेली दिसत आहेत. दरम्यान बोर्डी नजीकच्या अस्वाली धरणाच्या पायथ्याशी नोव्हेंबरच्या प्रारंभापासून काही कलमे मोहरली होती. आता तेथे वाटाण्याच्या आकारातील फळे धरली आहेत.
हा परिसर समुद्र किनाऱ्यापासून सुमारे पंधरा कि.मी. असून पश्चिम घाटाच्या रांगांमध्ये आहे. येथे ८ एकर क्षेत्रावर सुमारे २५० केशर, पायरी, राजापुरी या जातींच्या कलमांची लागवड केल्याची माहिती नंदकुमार दिनकर राऊत या बागायतदाराने दिली. या बागेला १५ नोव्हेंबर रोजी पाणी दिले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहर येण्यास सुरुवात झाली आहे.
तुडतुडा, विविध किडजन्य रोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बागेची नांगरट केली असून मोहराच्या संवर्धनासाठी फवारणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपासून तालुक्यातील तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता जाणवू लागली आहे. कलम मोहरण्यास हे अनुकूल वातावरण असून थंडी कायम राहिल्यास डिसेंबर अखेरीस सर्व झाडे मोहरतील असे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. जानेवारी मध्यापर्यंत झाडे मोहरली आणि पोषक वातावरण मिळाल्यास मागील वर्षीप्रमाणेच यंदाही एप्रिल अखेरीस ते मे मध्यावर तयार फळे मिळतील, अशी शक्यता अनुभवी बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, तालुक्यातील डहाणू, कासा आणि वाणगाव या मंडळातील एकूण तालुक्यात ८४४.२१ हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीचे आहे. तालुका कृषी विभागातर्फे आंबा मोहर संरक्षणाबाबत लवकरच कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे तर कोसबाड कृषी विज्ञान केंद्राकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
यंदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मोहरावर अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे परिणाम जाणवला होता. मात्र उत्तर कोकणात नेहमीपेक्षा लवकर झाडे मोहरली आहेत. त्यामुळे बाजारात फळे लवकर येऊन चांगला भाव मिळू शकतो. दोन वर्षांपासून या भागात काही कलमे लवकर मोहरण्याची प्रक्रि या घडत असून यंदाही तीच परिस्थिती दिसल्याने कृषी विभागाने त्याचा अभ्यास केल्यास उत्पादन लवकर येऊन बागायतदारांना आर्थिक फायदा होऊ शकतो. यामुळे आंबा बागायतदारांमध्ये समाधान दिसून येत आहे.

Web Title: As the cold grew, the mango streams began to flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.