लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- धावत्या लोकल मधून नारळ फेकल्याने एका तरुणाच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला होता . मुंबईत उपचारादरम्यान त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे. संजय भोईर (२५) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्यावर मुंबई येथील नायर रुग्णालयात उपचार सुरू होते.
संजय भोईर हा नायगाव आणि भाईंदर खाडीच्या मध्ये असलेल्या पाणजू बेटावर राहतो. तो गोरेगाव येथील खाजगी कंपनीत नोकरीला होता. संजय हा शनिवारी फेरीबोट ही विलंबाने सुरू असल्याने सकाळी साडे आठच्या सुमारास नायगाव भाईंदर रेल्वे खाडी पुलावरून पायी प्रवास करीत नायगाव स्थानकाच्या दिशेने निघाला होता. याच दरम्यान धावत्या लोकलमधून एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने नारळ फेकला. तो नारळ संजय याच्या डोक्याला लागला. यात तो गंभीर जखमी झाला.
याची माहिती तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मिळताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्याला वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर स्वरूपाची दुःखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांशी संपर्क केला असता त्यांच्याकडे अजूनही अशी कोणती नोंद केली नसल्याचे त्यांनी सांगितले. या घडलेल्या घटनेमुळे पाणजू गाव परीसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बोट बंद झाल्यानंतर नागरिकांना या रेल्वे उड्डाणपूलावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकल्यामुळे आतापर्यंत गावातील दहा ते बारा नागरिक जखमी झाले असून काही वर्षांपूर्वी संजयच्या आईवडीलांचाही लाकुडफाटा आणण्यासाठी आपल्या छोट्या बोटीतून गेले असताना बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती विलास भोईर यांनी दिली. संजय याच्या पश्चात आता मोठा भाऊ कृणाल आहे. यापूर्वी वैतरणा रेल्वे खाडी पुलावर ही धावत्या लोकलमधून नारळ फेकल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.
नायगाव व भाईंदर खाडीच्या बेटावर पाणजू हे गाव आहे. या भागातील नागरिकांना पाणजू बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो. काही वेळा हवामान बदलामुळे बोट विलंबाने सुरू असते. तर काही वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊन ही बोट बंद पडते. अशा वेळी काही प्रवासी नागरिक नायगाव भाईंदर खाडी पुलावरून पायी प्रवास करतात. लोकल मधून निर्माल्य फेकणाऱ्यावर रेल्वे प्रशासनाने बंदी आणावी व जे निर्माल्य फेकताना दिसून येतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Web Summary : A young man, Sanjay Bhoir, died after being hit by a coconut thrown from a local train near Naigaon. He was walking on a bridge when the incident occurred. He succumbed to his injuries in a Mumbai hospital. The incident has sparked outrage, with calls for stricter action against littering from trains.
Web Summary : नालासोपारा के पास एक लोकल ट्रेन से फेंके गए नारियल से संजय भोईर नामक एक युवक की मौत हो गई। वह नायगांव के पास एक पुल पर चल रहा था जब यह घटना हुई। मुंबई के एक अस्पताल में उसने दम तोड़ दिया। इस घटना से आक्रोश है और ट्रेनों से कचरा फेंकने के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की जा रही है।