- अनिरुद्ध पाटील, बोर्डीनॉर्थ कोकण चेंबर्स आॅफ कॉमर्स आणि चिकू फेस्टिवल फाऊंडेशन यांनी बोर्डीतील कॉम्पिंग ग्राऊंड येथे आयोजिलेल्या ४ थ्या चिकू महोत्सवाचे उद्घाटन आज खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते झाले. आ. मनिषा चौधरी अध्यक्षस्थानी होत्या. आमदार पास्कल धनारे, पालघर जि. परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले. डहाणू पंचायत समिती सभापती चंद्रिका आंबात, समाजकल्याण सभापती धर्मा गोवारी, इ. मान्यवर उपस्थित होते.डहाणू, घोलवड, व बोर्डी या गावांनी चिकूला ग्लोबल बनवले आहे. यामध्ये परिसरातील गावच्या लोकसंस्कृतीचा वाटा महत्वपूर्ण असून चिकूमुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट बनली आहे. शेती व पर्यटनाची सांगड घालून रोजगार निर्मितीकरीता व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सव आयोजनामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सुशिक्षित तरूणांना शेतीकडे वळविण्यात महोत्सवाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे मनोगत उपस्थित मानयवरांनी प्रतिपादीत केले. शनिवार, रविवार या दोन दिवसात चालणाऱ्या महोत्सवात स्थानिक सागरी, नागरी व डोंगरी लोक तसेच खाद्य संस्कृतीची ओळख घडविणारे सांस्कृतीक कार्यक्रम, खाद्यपदार्थ, हस्त व्यवसाय इ. दिडशेपेक्षा अधिक दुकाने आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
बोर्डीत चिकू महोत्सव उत्साहात
By admin | Updated: February 7, 2016 00:46 IST