बोईसर : बोईसर रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल पारसमध्ये देहविक्रय चालतो याची खबर बोईसर पोलिसांना मिळताच त्यांनी शनिवार संध्याकाळी उशिरा धाड टाकून एका दलाल महिलेसह, हॉटेल चालक, मॅनेजर, वेटर यांना पकडून अटक करण्यात आली आहे. तर तीन पिडीत महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हॉटेल पारसमध्ये अनैतिक व्यवसायाकरीता स्त्रिया पुरविल्या जातात याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सापळा रचून डमी ग्राहक पाठवून हॉटेलवर छापा टाकला असता हॉटेलचालक स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता लॉजिंगमध्ये पैशाच्या मोबदल्यात पुरूष ग्राहकांना पिडीत महिला पुरवून अनैतिक व्यवसाय करीत असताना रंगेहात पकडण्यात आले.धाडीमध्ये पकडण्यात आलेली दलाल महिला ही पिडित महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा व असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचे शोषण करीत होती. तर वेटर ही पुरूष ग्राहकांना पिडीत महिलेचे मोबाईल नंबर द्यायचे असेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर तीन पिडित महिलांना न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य त्या ठिकाणी पाठविण्यात येणार आहे तर दलाल महिला, हॉटेलचालक, मॅनेजर व वेटर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असलयाचे एपीआय महेश पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
बोईसरला देहविक्रय : हॉटेल पारसवर छापा
By admin | Updated: June 21, 2015 22:50 IST