सहा तरुणांनी सार्थ ठरवला संरक्षण यंत्रणांचा विश्वास; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने समुद्रात बंद पडली ‘अग्निमाता’ बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 02:05 AM2020-11-29T02:05:56+5:302020-11-29T02:06:00+5:30

या बोटीला सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले आहे. सातपाटीतील ज्ञानेश्वर तांडेल हे आपल्या मालकीची ‘अग्निमाता’ ही बोट घेऊन गुरुवारी सकाळी ६ वाजता समुद्रात मासेमारीला गेले होते.

The boat 'Agnimata' was stranded at sea due to engine failure | सहा तरुणांनी सार्थ ठरवला संरक्षण यंत्रणांचा विश्वास; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने समुद्रात बंद पडली ‘अग्निमाता’ बोट

सहा तरुणांनी सार्थ ठरवला संरक्षण यंत्रणांचा विश्वास; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने समुद्रात बंद पडली ‘अग्निमाता’ बोट

Next

हितेन नाईक

पालघर : समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ले अथवा संशयित हालचालीवर लक्ष पुरविण्यासाठी आम्ही सक्षम असलो तरी आमचे खरे डोळे हे समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारच असल्याचा पुनरुच्चार संरक्षण यंत्रणांनी अनेक वेळा केला आहे. या देशाच्या संरक्षण यंत्रणांचा विश्वास सार्थ करून दाखविला तो सातपाटीमधील सहा धाडसी मच्छीमार तरुणांनी. सातपाटी बंदरातून गुरुवारी सकाळी समुद्रात मासेमारीला गेलेली ‘अग्निमाता’ ही बोट इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बंद पडली होती.

या बोटीला सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले आहे. सातपाटीतील ज्ञानेश्वर तांडेल हे आपल्या मालकीची ‘अग्निमाता’ ही बोट घेऊन गुरुवारी सकाळी ६ वाजता समुद्रात मासेमारीला गेले होते. त्यांच्या बोटीत दिलीप माणिक तांडेल, जगन्नाथ लक्ष्मण तांडेल आणि प्रवीण पांडुरंग धनू हे मच्छीमार होते. सकाळी मासेमारीला जाऊन संध्याकाळी पुन्हा किनाऱ्यावर येणारी बोट शुक्रवारीही आली नसल्याने त्या सर्वांचे कुटुंबीय काळजीत पडले होते. याबाबत सातपाटी सागरी पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर दहाळकर यांनी या बेपत्ता बोटीबाबत कोस्टगार्ड, नेव्ही, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आदींसह जिल्ह्यातील ११२ किमीवरील सर्व सागरी पोलीस ठाण्यांना कळवीत स्वतः या घटनेकडे लक्ष पुरवत होते.

तीन दिवस झाले तरी त्या बोटीचा आणि मच्छीमारांचा शोध लागत नव्हता. शनिवारी सकाळी सातपाटी येथील चार बोटी त्यांच्या शोधार्थ समुद्रात गेल्यानंतर महालक्ष्मी प्रसादमधील मच्छीमारांना एडवन भागात ‘अग्निमाता’ बोट उभी असल्याचे दिसले. बोटीच्या इंजिनमधील क्रांक शॉप तुटल्याने ते अडकून पडल्याचे त्या बोटीतील मच्छीमारांनी सांगितले.

आम्हाला घराची ओढ लागल्याने किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी बोटीला शीड लावून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु विरुद्ध बाजूने वाऱ्याचा वेग असल्याने आम्ही अपयशी ठरत होतो, असे बोटीचे मालक ज्ञानेश्वर तांडेल यांनी सांगितले. आम्ही मदतीसाठी देवाचा धावा करीत असताना आमचे मच्छीमार बांधव मदतीला धावून आले. त्यांनी शनिवारी दुपारी किनारा गाठल्यानंतर उपस्थित कुटुंबीयांनी त्यांना गच्च मिठ्या मारून आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. या वेळी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. सपोनि दहाळकर यांनी सर्व सुखरूप आलेल्या मच्छीमारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

प्यायला पाणी नाही
आजूबाजूने जाणाऱ्या अनेक बोटींना मदतीसाठी हाका मारूनही कोणी मदतीसाठी धावून आले नाही. तीन दिवसांपासून अडकलो असताना साधे पिण्याचे पाणीही मिळाले नसल्याचे सांगून काही माणसांतल्या संवेदना इतक्या बोथट झाल्याचे पाहून रडायला आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The boat 'Agnimata' was stranded at sea due to engine failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.