बविआ आमदार विलास तरे शिवसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 05:20 AM2019-08-26T05:20:48+5:302019-08-26T05:39:36+5:30

विधानसभेच्या तोंडावर धक्का : ‘भगवान भला करे’ची ठाकुरांची प्रतिक्रिया

Bivia MLA Vilas Tare joins Shiv Sena | बविआ आमदार विलास तरे शिवसेनेत

बविआ आमदार विलास तरे शिवसेनेत

Next

पालघर/बोईसर : वसई-विरारनंतर बहुजन विकास आघाडीने बालेकिल्ला म्हणून घडविलेल्या बोईसरमधील त्या पक्षाचे आमदार विलास तरे यांनी रविवारी संध्याकाळी समर्थकांसह ‘मातोश्री’वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. पालघर लोकसभेची पोटनिवडणूक आणि नंतरच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला युतीने धक्का दिला. त्यानंतर विधानसभेच्या तोंडावर त्या पक्षाला हा मोठा हादरा मानला जातो.


तरे यांच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही. ‘भगवान उसका भला करें’ अशी प्रतिक्रि या बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली. विलास तरे हे शिवसेनेकडून २००४ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी २००८ मध्ये बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. २००९ ते २०१९ या दहा वर्षांत अशा दोन वेळा ते हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून विधानसभेवर निवडून गेले.
सध्याची युतीची भक्कम स्थिती पाहता काही महिन्यांपासून ते शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक होते. शिवसेनेतर्फे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सध्या ठाण्यासोबत पालघरचीही जबाबदारी आहे. या दोन्ही जिल्ह्यांतून सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातूनच तरे यांची घरवापसी झाल्याचे मानले जाते. यावेळी बोईसर पूर्व, वालीव भागातील तरे यांचे समर्थक हजर होते. या वेळी मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, राजेश शहा, तालुकाध्यक्ष विकास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेत तरे यांनी आमदारकीचा राजीनामा देत तांत्रिक बाबींची पूर्तता केल्याचे सांगितले जाते.


हितेंद्र ठाकुरांच्या कोंडीचे प्रयत्न
वसई, विरार, नालासोपारा हा परिसर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यापाठोपाठ बोईसर विधानसभा मतदारसंघात त्या पक्षाने पाय रोवले. ज्याप्रमाणे मीरा-भाईंदरमध्ये त्यांना हवा तसा विस्तार करता आला नाही, तशीच काहीशी अवस्था जिल्ह्याच्या अन्य भागातही होती. बविआच्या ताब्यात सध्या वसई, नालासोपारा, बोईसर हे तीन मतदारसंघ आहेत. या तिन्ही विधानसभा मतदारसंघात हादरा देण्याचे प्रयत्न भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केले आहेत. यापूर्वी ठाकूर यांचा पराभव करणारे श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. वसईतून त्यांना पुन्हा विधानसभेसाठी उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वसई परिसरातील ख्रिस्ती समाजाने ठाकूर यांच्याविरोधात पंडित यांना यापूर्वी पाठिंबा दिला होता. पंडित पूर्वी शिवसेनेचे उपनेते होते. त्यांच्या संघटनेने जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मदत केली होती. नालासोपारा मतदारसंघात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उभे केले जाईल, अशी चर्चा आहे. बोईसरमधील त्या पक्षाच्या विद्यमान आमदारालाच फोडण्यात आले आहे. यातून ठाकूर यांच्यासह त्यांच्या पक्षाची कोंडी करत त्यांना बालेकिल्ल्यातच नामोहरम करण्याची व्यूहरचना युुतीच्या नेत्यांनी केली आहे.

Web Title: Bivia MLA Vilas Tare joins Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.