बोईसर : तारापूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (बीएआरसी) लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) च्या अधिपत्याखाली असलेल्या व काढलेल्या सत्तरपैकी वीस कामगारांना पुन्हा कामावर घेतल्याने २४ आॅगस्टपासून सुरू झालेले बेमुदत कामबंद आंदोलन सोमवारपासून मागे घेण्यात आले आहे.बी.ए.आर.सी.च्या प्रकल्पामधील ए.एस.एफ.एस.एफ. या प्लान्ट उभारणीचे काम एल अॅण्ड टी करीत असून त्या कामाकरिता या प्रकल्पालगतच असलेल्या घिवली गावातील सत्तर कामगारांना कंत्राटी स्वरूपात घेण्यात आले होते. त्यापैकी वीस कामगारांचा पगार बंद केल्याने शिवसेनेसह ग्रामपंचायत व ग्रामस्थांबरोबर गावातील काम करणाऱ्या इतर पन्नास कामगारांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते. संपात सहभागी न झालेल्या सुमारे पाचशे परप्रांतीय कामगारांना संपाच्या दुसऱ्याच दिवशी (दि. २५ आॅगस्ट) पोलीस बंदोबस्तात प्लान्टमध्ये नेण्याचा प्रयत्नही ग्रामस्थांनी हाणून पाडला होता.आंदोलनादरम्यान पोलीस व जिल्हा प्रशासनाबरोबर अनेक बैठका झाल्या. अखेर, शनिवारी (५ सप्टेंबर) रोजी प्रांत शिवाजी दावभट यांच्या दालनात सेना नेते व एल अॅण्ड टी चे अधिकारी यांच्याबरोबर संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत काढलेल्या कामगारांना पुन्हा सामावून घेऊन त्यांना चारपैकी दोन महिन्यांचा पगारही देण्याचे एल अॅण्ड टी च्या व्यवस्थापनाने मान्य केल्याने बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलक कामगारांच्या पाठीशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, तालुकाप्रमुख सुधीर तामोरे, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ व उदय पाटील, सेनेचे पदाधिकारी शैलेश मोरे, देवानंद मेहेर, राजेश कुटे, भुवनेश्वर पागधरे, संतोष मोरे, सरपंच भुवनेश्वर हिलीम, उपसरपंच सुनील प्रभू, उपसभापती मनोज संखे यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक होते. पोळा,गौरी,गणपती, ईदच्या आधी हेआंदोलन शांततामय रितीने संपविल्याबद्दल पोलीस, प्रशासन व जनतेत समाधान व्यक्त होते आहे. (वार्ताहर)
बीएआरसीच्या कंत्राटी कामगारांचा संप मागे
By admin | Updated: September 7, 2015 22:42 IST