- मंगेश कराळे
नालासोपारा :- अर्नाळा पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या ग्राऊंडवर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जप्त केलेल्या वाहनांना आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी घडलेल्या सदर घटनेत सुदैवाने कुणालाच ईजा व जिवीतहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाळा पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या ग्राऊंडवर विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने मुद्देमाल म्हणून जमा आहेत. यात दुचाकी, चारचाकी वाहनेही मोठ्या प्रमाणात आहेत. सकाळी अचानक या भंगार वाहनांच्या गर्दीतुन धुर निघायला लागला. अल्पावधित इथल्या वाहनांनी पेट घेतला.
ही आग इतकी भीषण होती कि नजिकच्या परिसरात पसरण्याची चिन्हे निर्माण झाली होती. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने पथकाची २ वहाने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात १२ वाहने जळून नष्ट झालेली आहेत.
अद्याप पर्यंत आगीचे नेमके कारण समजलेले नाही. तरी याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे व जळीत रजिस्टरला नोंद घेण्यात आल्याचे अर्नाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी लोकमतला सांगितले.