मुंबई : वसई-विरार परिसरात राखीव ६० एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारती प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची सोमवारी ईडीने सपत्नीक १० तास चौकशी करीत जबाब नोंदवला. ते त्यांच्या पत्नीसह ईडीच्या वरळी येथील सी. जे. हाउसमधील कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता दाखल झाले.
रात्री पावणे दहा वाजता ते पत्नीसह कार्यालयातून बाहेर पडले. गेल्या आठवड्यात ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केले होते.
अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनिलकुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणात त्यांनी प्रति चौरस फूट २० ते २५ रुपये दराने लाच स्वीकारल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात आढळून आले. तर पालिकेचे तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांनी प्रति चौरस फूट १० रुपये दराने ४१ इमारतींसाठी लाचखोरी केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. तसेच यात कनिष्ठ अभियंते, वास्तुविशारद, सनदी लेखापाल आणि अनेक एजंटदेखील सहभागी आहेत. या प्रकरणी मीरा-भाईंदर पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी २९ जुलै रोजी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापेमारी केली. त्यावेळी नाशिक येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी १ कोटी ३३ लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. अनिलकुमार पवारांच्या नातेवाइकांच्या नावे आढळलेली बेनामी मालमत्तेची कागदपत्रेदेखील अधिकाऱ्यांनी जप्त केली.
ईडीने यापूर्वी या प्रकरणात गुंतलेल्या लोकांवर केलेल्या छापेमारीत ८ कोटी ९४ लाख रुपये, २३ कोटी २५ लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने, १३ कोटी ८६ लाख रुपयांचे शेअर्स, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, बँकेतल्या ठेवी जप्त केल्या आहेत. मंगळवारीही अनिलकुमार यांना चौकशीसाठी बोलावले आहे.