अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:11 AM2019-09-25T00:11:58+5:302019-09-25T00:12:08+5:30

डहाणूतील प्रकार; कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन

American military alligator | अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव

अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव

Next

- अनिरुद्ध पाटील 

डहाणू/बोर्डी : कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. ही नवीन प्रकारातील कीड असून तिची व्याप्ती आणि पिकांचे नुकसान करण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याने याबाबत गांभीर्य बाळगून तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

ही बहुभक्षीय पिकावरील कीड असून मका हे तिचे प्रमुख खाद्यान्न आहे. या तालुक्यात नव्यानेच तिचा शिरकाव झाल्याची बाब कृषी शास्त्रज्ञांना आढळली असून भविष्यात अन्य पिकावर तिचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या तालुक्यात भात, मिरची, भाजीपाला आणि सफेद जाम्बु, चिकू ही प्रमुख फळपिके आहेत. त्याच्यावर लागण झाल्यास पीक हातचे जाऊन उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कोणत्याही भागात ती निदर्शनास आल्यानंतर त्वरित या कृषी विज्ञान केंद्राला सूचना दिल्यास प्रतिबंधात्मक उपाय योजता येऊ शकतील असे केंद्राचे म्हणणे आहे. शिवाय याबद्दल शेतकऱ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण आयोजित करणार असल्याची माहिती कृषी शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खरीप हंगामात मक्याचे पीक न घेण्याचे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले होते. या तालुक्यात भात हेच मुख्य पीक असून दुग्ध उत्पादकांकडून चारा पीक म्हणून मका लागवड केली जाते. त्यामुळे त्या माध्यमातून या किडीच्या प्रचार-प्रसाराची भीती व्यक्त होत आहे.

तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप भात लागवड, तर सुमारे ५ हजार हेक्टरावर चिकू लागवड आहे. जर अन्य भात पिकावर लागण झाल्यास, नुकसानीचा आकडा मोठा असेल. त्यामुळे तालुका कृषी विभागाला विशेष धोरण आखावे लागणार आहे.

‘उन्नत शेती समृद्ध शेतीच्या माध्यमातून खरीप भात लागवडी पूर्वीच्या प्रशिक्षणात शेतकºयांना याबाबत मार्गदर्शन केले आहे. आवश्यकता भासल्यास कृषी विज्ञान केंद्राशी समन्वय साधून कार्यक्र म आखण्यात येईल.’ - संतोष पवार (तालुका कृषी अधिकारी, डहाणू)

‘अमेरिकन लष्करी अळी ही नवीन कीड आहे. कोसबाड येथील एका शेतात ती प्रथम आढळली आहे. ही अळी अनेक प्रकारच्या पिकांना खाद्य बनवते. लवकरच एकात्मिक कीड नियंत्रणाकरिता प्रकाश सापळा, फेरोमेन सापळा, जैविक पद्धत, रासायनिक किटकनाशक इत्यादि पद्धतीचा वापर करावा.’
- प्रा.उत्तम सहाणे (कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड)

Web Title: American military alligator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.