आशिष राणेपालघर/वसई : पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी जव्हार, पालघर व डहाणू येथील आरोग्य व्यवस्थेसाठी प्रत्येकी सव्वा टन (१२५ जम्बो सिलिंडर प्रतिदिन) ऑक्सिजनची लवकरच निर्मिती होणार आहे. या हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार नुकतीच ३ कोटी २० लाखांच्या प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी जिल्हा विकास योजनेतून देण्यात आली आहे. त्यापैकी पालघर व जव्हारचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा माहिती केंद्राने दिली आहे.
विशेष म्हणजे हा ऑक्सिजन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जातील, तर सोबत उपजिल्हा रुग्णालय, जव्हार व डहाणू ग्रामीण रुग्णालय पालघरवरील सर्व ठिकाणी कोविड रुग्णालये स्थापन करण्याचे कार्य सुरू झाले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले आहे.