‘बजाज हेल्थकेअर’वर होणार कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:10 AM2021-01-06T00:10:11+5:302021-01-06T00:10:21+5:30

तारापूर एमआयडीसी : घातक रासायनिक सांडपाणी सोडताना पकडले रंगेहाथ

Action will be taken against Bajaj Healthcare | ‘बजाज हेल्थकेअर’वर होणार कारवाई 

‘बजाज हेल्थकेअर’वर होणार कारवाई 

Next



पंकज राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क 
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील बजाज हेल्थकेअर या कारखान्यातून गडद हिरव्या रंगाचे घातक रासायनिक सांडपाणी छुप्या पद्धतीने रात्रीच्या वेळी सोडताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) तारापूर येथील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे.
तारापूर येथील प्लॉट नंबर एन -१७८ मधील या कारखान्यातून पॉझिटिव्ह डिस्चार्ज पाइपलाइनमधून एमआयडीसीच्या चेंबरमध्ये सोडण्याऐवजी छुप्या पद्धतीने टाकलेल्या ग्रॅव्हिटी पाइपलाइनद्वारे सांडपाणी सोडत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याबाबत कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे तारापूर येथील उपप्रादेशिक कार्यालयातून पाठविण्यात आलेला आहे, मात्र प्रादेशिक कार्यालयातून कारवाईस विलंब होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडणाऱ्या बजाज हेल्थ केअर या अतिप्रदूषणकारी कारखान्याचा पर्दाफाश प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असला तरी याच कारखान्याचे चार कारखाने याअगोदरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले आहेत. तर राष्ट्रीय हरित लवादाने कोट्यवधी रुपयांचा दंड येथील कारखान्यांवर ठोठावला असला तरी तारापूरमधील प्रदूषण बेसुमार सुरूच आहे. रासायनिक कारखान्यातून छुप्या पद्धतीने घातक रसायन कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर संयुक्तपणे रात्रीच्या वेळी कारखान्यांची तपासणी सुरू केली होती. मात्र कारवाईला १५ दिवस उलटून गेले असतानादेखील प्रादेशिक कार्यालय ठाणे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे बजाज हेल्थकेअर कारखान्याला कोणत्या दबावामुळे मोकळीक दिली जाते, असा प्रश्न उपस्थित केला
जात आहे.

बजाज हेल्थकेअर कारखान्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अहवाल प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
- मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण 
नियंत्रण मंडळ, तारापूर

Web Title: Action will be taken against Bajaj Healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.