नालासोपारा (मंगेश कराळे) - वसईतील काही गर्भश्रीमंत व अय्याश घटकांसाठी सोईचे ठरणारे बार रात्री आ. स्नेहा दुबे यांनी स्वत: भेटी देऊन बंद केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या पाहणीसाठी बाहेर पडलेल्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी मध्यरात्री बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दोन बारवर धडक कारवाई केली. रविवारी, २४ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे २.३५ च्या सुमारास वसईतील दत्ताणी मॉल परिसराची पाहणी करताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
अधिक माहिती नुसार, दत्ताणी मॉलमधील विंग्स ऑन फायर आणि पंखा फास्ट हे दोन बार निर्धारित वेळेनंतरही सुरू होते. या ठिकाणी मोठा आवाजात डीजे वाजवला जात होता. एवढंच नाही, तर मॉलबाहेर मद्यधुंद तरुण भांडणं करत असल्याचेही दिसून आले. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही मध्यरात्री २.३० नंतरही हे बार खुले असल्याचे पाहून आमदार दुबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदारांनी तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बार मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
या कारवाईनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, “आमचा कोणत्याही वैध व्यवसायाला विरोध नाही, पण कायद्याचे उल्लंघन करून रात्री २.३० नंतर सुरू असलेल्या बारवर कठोर कारवाई केली जाईल. यापुढेही आमची ही भूमिका ठाम राहील.” या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांवर जरब बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अश्या स्वरूपाच्या बार मधे महसूल, महापालिकेमधील कर्मचारीही सामिल असतात. अंडर टेबल लाखो रुपये कमवणारे अवैध कमवलेली माया याच ठिकाणी उडवतात. धाड पडल्यावर तब्बल अर्धा तास दरवाजे न उघडल्याने गोंधळाचा फायदा घेत ही मंडळी गायब झाल्याची वंदता आहे. तसेच या बार बाहेर उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी कोकणे व बेलकर हे बराच काळ जणू या बारच्या समर्थनार्थ उपस्थित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचीही उत्तरपुजा आमदारांनी बांधली होती. यावर चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.