मोखाडा : कोट्यवधीची कामे करून टक्केवारी खाऊन ढेकरही न देणारा सार्वजनिक बांधकाम विभाग किरकोळ कामाकडे मात्र दुर्लक्ष करतो आणि त्यातून विद्यार्थी व नागरीकांची कशी पायपीट होते? याचे जळजळीत उदाहरण या तालुक्यात पाहायला मिळते आहे. धामणशेत कोशिमशेतकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नवीन पुलाचे काम झाले मात्र दोन्ही बाजूंनी खोदलेली माती कामासाठी वापरल्याने सिमेंट आणि दगड पूर्ववत न करता तसेच ठेवल्याने तिथून एसटी जाणे बंद झाले त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना ७ ते ८ किमीची पायपीट करावी लागते आहे. यामुळे अगदी एका दिवसात होणारे काम तेही त्यांचीच जबाबदारी असतांनाही रखडल्याने आज येथील नागरीकांनाही तशीच पायपीट करावी लागते आहे.मोखाडा खोडाळा रस्त्यावर सडकवाडी गावच्या पुढून धामणशेत फाटा आहे या फाट्यापासून आत मध्ये कोशिमशेत धामणशेत पेंडक्याचीवाडी कोशिमशेत गावठाण पायरवाडी सोनारवाडी बेहेटवाडी ठाकुरवाडी अशी गावे आहेत सर्व गावातून जवळपास ३५ हून अधिक मुले पुढील शिक्षणासाठी डोल्हारा किंवा खोडाळा याठीकाणी जातात गतसालापर्यंत याठीकाणी बस यायची यामुळे कधीच कसली अडचण आली नाही मात्र यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याठिकाणी नवा पुल बांधण्यात आला. ही बाब चांगली झाली मात्र पुल बांधल्यानंतर त्याचे पिचींग होणे गरजेचे असते. ती झालीच नाही यामुळे त्यावरून मोठ्या वाहनांना जाणे अशक्य झाले. त्यातूनच मग हक्काची बससेवाही बंद झाली.यामुळे पुल नेमका लोकांच्या सोयीसाठी बनवला कि अडचणीसाठी असा सवाल उपस्थित झाला असून जर तात्काळ याचे काम पुर्ण नाही केले तर आंदोलन करू असा ईशारा आता येथील ग्रामस्थानी दिला आहे.>काम लवकर पूर्ण करण्याची मागणीमुळात हे काम करण्यासाठी खूप कमी वेळ आणि कमी मजूर लागतील अशी स्थिती आहे. मात्र असे असतानाही सरकारी काम आणि वरीसभर थांब या आपल्या उक्तीप्रमाणेच वागायचे असा जणू चंगच या बांधकाम विभागाने बांधला आहे काय? असा सवाल उपस्थित होत असून हा रस्ता लवकर खुला करावा अशी मागणी स्थानिक जनता करीत आहे.
रस्ता खोदल्याने ७ किमीची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:23 IST