- मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. वसईतील विविध परिसरात अंमली पदार्थांचा वाढता व्यापार हे चिंतेचे कारण आहे. गुरुवारी रात्री वसई पूर्वेकडील फादरवाडी येथे अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपीकडून गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी ८ करोड ४ लाख रुपये किंमतीचा २ किलो हेरॉईन नावाचा अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी शुक्रवारी दिली आहे.
गुरुवारी रात्री गुन्हे शाखा युनिट तीनचे सपोनि सुहास कांबळे यांना माहिती मिळाली की, वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे अंमली पदार्थ विक्रीसाठी आरोपी येणार आहेत. अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी वरिष्ठांचे आदेश असल्याने अंमली पदार्थाबाबत मिळालेल्या माहितीची खात्री करुन कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे हे पोलीस पथक व पंचासह फादरवाडीच्या रेंजनाका रोडवरील श्रीपाल १ टॉवर समोर सापळा रचून थांबले. रात्रीच्या सुमारास एक स्विफ्ट कार टॉवरचे समोर येवुन थांबली. त्या गाडीतील तीन लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगची पंचांसमक्ष झडती घेतल्यावर तिघांकडे ८ लाख ४ लाख ४० हजार रुपये किंमतीचा २ किलो ११ ग्रॅम वजनाचा हेरॉईन नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. समुंदरसिंग रुपसिंग देवडा (४९), युवराजसिंग भवानीसिंग राठोड (१८) आणि तकतसिंग करणसिंग राजपुत (३८) हे तीन आरोपींची नावे असून तिघे राजस्थान राज्यातील आहेत. पोलिसांनी ५ लाख ६५ हजार रुपये किंमतीची स्विफ्ट कार व मोबाईल असा एकूण ८ करोड १० लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिन्ही आरोपी विरोधात वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास व कारवाईसाठी देण्यात आले आहे.
उपरोक्त कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.