लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ती मला पाहिजेच, काहीही झाले तरी मी प्रेम प्रकरणात यशस्वी झालोच पाहिजे, अशा मोहामुळे प्रेमवेडे अनेक तरुण सध्या भोंदूबाबांच्या मायाजालात अडकत चालले आहेत. तिला पटविण्यासाठी या मंत्राचा जप करा, तिचे नाव लिहून तिचा फोटो झाडाला लटकवा, विशिष्ट वस्त्र किंवा केस मिळवून पूजा करा असे अनेक विचित्र अघोरी उपाय भोंदूबाबांकडून तरुणाईला सुचवले जात आहेत. हे सारे चित्र वर्धा जिल्ह्यात सुरु आहे.
शहरालगतच्या ग्रामीण भागात अशा भोंदू बाबांचा अक्षरश सुळसुळाट सुरु आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात भोंदू बाबांची पॉवर चांगलीच वाढली आहे. अगदी बैलगाडी, घोडागाडी, श्वान शर्यत जिंकण्यापासून ते प्रेम प्रकरणात यशस्वी होण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींवर अघोरी उपाय या बाबांकडून सुचवले जात आहेत.
शर्यतीत फोनवरून वशीकरण मंत्रसध्या तर बैलगाडा शर्यत अंधश्रद्धेच्या मगरमिठीत अडकली आहे. आपला बैलच जिंकावा, यासाठी शर्यत सुरू होताच भोंदूबाबाला फोन लावला जातो. प्रतिस्पर्धी बैलाचे नाव सांगितले जाते. आपल्या पुढे किती गाड्या आहेत, आपल्या मागे किती गाड्या आहेत ही सर्व माहिती दिली जाते. यानंतर बाबांकडून सूचना दिल्या जातात.
रुमाल टाकताच बैल जाग्यावर बसण्याचा दावासध्या वाड्या-वस्त्यांपासून ते अगदी शहरांपर्यंत बैलगाडा, शर्यतींची क्रेझ आहे; मात्र या शर्यतींना देखील भोंदूबाबांनी अंधश्रद्धेचे ग्रहण लावले आहे. रुमाल टाकताच बैल जाग्यावर बसणारच, असे चॅलेंज या भोंदूंकडून दिले जाते. त्यामुळे असल्या भोंदूबाबांना चार-पाचशे रुपये द्यायचे, बैलावरून लिंबू ओवाळून टाकायचा, शर्यतीच्या मैदानावर प्रतिस्पर्धी बैलाच्या नावाने नारळ फोडणे, अंगारा फुंकणे, लिंबू ओवाळून फेकण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत.
भोंदू पॉवरमुळे स्मशानभूमीवर सीसीटीव्ही बसविले कॅमेरे
- शहराजवळच्या गावांमध्ये भोंदूबाबांची पॉवर सध्या चांगलीच वाढली आहे.
- अघोरी कृत्यांमुळे गावकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. ठरावीक दिवशी तर इतकी गर्दी होते की, गावात पाय ठेवायला जागा नसते.
- स्मशानभूमीत अघोरी कृत्य होत असल्याने काही गावातील तसेच शहरातील स्मशानभूमीत अक्षरश सीसीटीव्ही बसविण्याची वेळ आली आहे.
गेल्या पाच वर्षात झाले जिल्ह्यात नऊ गुन्हे दाखलभोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मागील पाच वर्षात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३ अन्वये विविध पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
"लिंबू उतरवून टाकणे किंवा फोटो झाडाला टांगणे या साऱ्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत. असे प्रकार करणाऱ्या भोंदू बाबांची भोंदूगिरी मोडून काढण्याची गरज आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी त्वरित कारवाई केली पाहिजे. ग्रामीण भागात शिक्षण, चर्चा आणि प्रबोधनातून या प्रकारावर मात करण्याची गरज आहे."- पंकज वंजारे, राज्य युवा संघटक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती.