८३ आंदोलकांची अटक व सुटका : शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी वर्धा : आम आदमी पार्टी व गाव बचाव संघर्ष समिती भूगावच्यावतीने उत्तम गलवा कंपनीमार्फत सर्व ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करावा यासह अन्य मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी टी-पॉर्इंट इंझापूर येथे रास्ता राको व जेलभरो आंदोलन केले. यावेळी सुमारे ८३ आंदोलकांची अटक व सुटका करण्यात आली. उत्तम गलवा या कंपनीतून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे भूगावसह परिसरातील गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे या सांडपाण्याचा निचरा थांबवावा. रासायनिक पाण्याचे शुद्धीकरण करून तेच पाणी कंपनीने पुन्हा वापरावे. प्रदूषणाने जमिनीचा पोत घसरला वर्धा : कंपनीने दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीची पोत रासायनिक पाणी व धुलकणांमुळे उतरली आहे. यामुळे पीक उत्पादकता १० ते २० टक्क्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना जमिनीची पोत ठिक होईपर्यंत वार्षिक २५ हजार रुपये हेक्टरी मोबदला द्यावा. स्थानिक युवक-युवतींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्वरित नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शासन नियम व कंपनीला मान्य करारानुसार ८० टक्के ग्रामस्थ व वर्धा जिल्ह्यातील युवक, युवतींना नोकरी द्यावी. परिसरातील गावांत स्थायी आरोग्य सेवा सीएसआर फंडातून मोफत द्यावी. कंपनीच्या चिमणीची उंची २७५ मिटर करावी. कंपनी ३०० ते ५०० पीपीएम धुळ दररोज वातावरणात सोडते. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कार्यवाही करावी. कंपनीचे पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण काढावे. रस्ते मोकळे करावे, आदी मागण्या लावून धरल्या आहेत. आंदोलनात आप व गाव बचाव संघर्ष समितीचे रवींद्र साहु, देवेंद्र वानखेडे, भुगावच्या सरपंच प्रिया उगेमुगे, माजी सरपंच अनुसया आत्राम, ग्रा.पं. सदस्य पुष्पा वानखेडे, प्रिया उरकुडे, आरती ढुमणे, महादेव धोपटे, प्रमोद भोयर, अजीत इंगोले, मंगेश शेंडे, प्रमोद भोमले, बाबूजी ढगे यासह नागरिक सहभागी झाले होते.(कार्यालय प्रतिनिधी)
इंझापूर येथे आपचे जेलभरो
By admin | Updated: August 14, 2016 00:12 IST